Sunday, August 30, 2009

CH 53 अश्रूचे दोन टपोरे थेंब (समाप्त)

आता थोड्याच वेळात ऍंथोनीला डेथ चेंबरमध्ये इलेक्ट्रीकच्या चेअरवर बसवून देहांताची शिक्षा देण्यात येणार होती. डिटेक्टीव सॅम, शिक्षा देणारा अधिकारी, एक डॉक्टर आणि अजून एकदोन ऑफिसर्स डेथ चेंबरच्या समोर उभे होते. तेवढ्यात दोन पोलिस अधिकारी बेड्या घातलेल्या अवस्थेत ऍंथोनीला तिथे घेवून आले. देहांताची शिक्षा देण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याने आपल्या घड्याळाकडे बघितले आणि पोलिस अधिकाऱ्यांना खुनावले. पोलिस अधिकाऱ्यांनी ऍंथोनीला इलेक्ट्रीक चेअरकडे नेले.

'' ऑपेरटर कुठे आहे '' त्यातल्या एका अधिकाऱ्याने विचारले.

एक माणूस लगबगीने समोर आला. आणि इलेक्ट्रीक चेअर ऑपरेट करण्याच्या पॅनलजवळ गेला.

ज्या पोलिसांनी ऍंथोनीला इलेक्ट्रीक चेअरजवळ नेले होते त्यांनी त्याला आता त्या खुर्चीवर बसविले. काळ्या कापडाने त्याचा चेहरा झाकण्यात आला. मग ते पोलिस इलेक्ट्रीक चेअर चेंबरमधून बाहेर आले आणि त्यांनी चेंबर बंद करुन घेतले.

मुख्य अधिकाऱ्याने पॅनलजवळ उभ्या असलेल्या ऑपरेटरकडे बघितले. ऑपरेटर एकदम तयार असल्याच्या पावित्र्यात त्या पॅनलजवळ उभा होता. पुन्हा तो अधिकारी घड्याळाकडे पाहू लागला. कदाचीत त्याची उलटी गीणती सुरु असावी.

जरी त्या लोकांना हे नेहमीचं असलं तरी वातावरणात नाही म्हटलं तरी थोडा तणाव दिसायला लागला.

अचानक त्या अधिकाऱ्याने ऑपरेटरला इशारा केला.

ऑपरेटरने एका क्षणाचाही विलंब न लावता इलेक्ट्रीक चेअर पॅनलवरचे एक लाल बटन दाबले.

थोड्या वेळाने ऑपरेटरने 'काम तमाम झालं' या पावित्र्यात त्या अधिकाऱ्याकडे बघितलं.

'' डॉक्टर '' त्या अधिकाऱ्याने डॉक्टरच्या नावाचा पुकारा केला.

डॉक्टर लगबगीने इलेक्ट्रीक चेअर चेंबरजवळ गेला, चेंबर उघडलं आणि आत गेला.

'' सर ही इज डेड'' आतूनच डॉक्टरचा आवाज आला.

तो अधिकारी गर्रकन वळला आणि ती जागा सोडून चालता झाला. तो ऑपरेटर तिथेच बाजुला असलेल्या एका खोलीत गेला. तिथे बाजुलाच उभा असलेला एक स्टाफ मेंबर त्या चेंबरमध्ये, कदाचित चेंबर साफ करण्यासाठी शिरला. सगळं कसं एखाद्या कवायतीप्रमाणे सुरु होतं. त्या सगळ्यांना जरी ते नेहमीचंच असलं तरी जॉनसाठी काही तो नेहमी पार पडणारा सोहळा नव्हता. तो अजुनही तिथेच उभा राहून एक एक सोपस्कार न्याहाळून पाहत होता.

आता डॉक्टरही तिथून निघून गेला होता.

आता फक्त तिथे सॅम एकटाच उरला होता. तो अजुनही तिथे स्तब्ध उभा होता, त्याच्या डोक्यात कदाचित वेगळेच विचार सुरु असावेत.

अचानक कुणीतरी लगबगीने त्याच्या पाठीमागुन तिथे आला.

'' अच्छा झालं वाटते'' मागुन आवाज आला.

सॅमने वळून मागे पाहाले आणि सॅमला आश्चर्याचा धक्काच बसला. ऑपरेटर त्याच्या समोर उभा होता.

हा तर आत्ताच पॅनल ऑपरेट करुन त्या बाजुच्या खोलीत शिरला होता...

मग आत्ताच्या आत्ता हा इकडून कुठून आला...

'' मला काळजी होती की माझ्या अनुपस्थीतीत सगळं कस काय पार पडेल... '' तो ऑपरेटर म्हणाला.

'' बाय द वे कुणी ऑपरेट केलं पॅनल'' त्या ऑपरेटरने सॅमला विचारले.

सॅमला एकावर एक आश्चर्याचे धक्के बसत होते.

सॅमने बाजुच्या खोलीकडे बघितले.

'' कुणी ऑपरेट केला म्हणजे?... तुच तर ऑपरेट केला'' सॅम अविश्वासाने म्हणाला.

'' काय गोष्टी करता... मी तर हा आता इथे आलो..'' त्या ऑपरेटरने म्हटले.

सॅमने पुन्हा गोंधळून त्याच्याकडे आणि मग त्या बाजुच्या रुमकडे बघितले ज्यात तो मघा गेला होता.

'' ये माझ्या सोबत ये'' सॅम त्याला त्या बाजुच्या खोलीकडे घेवून गेला.

सॅमने त्या खोलीचं दार ढकललं. दार आतून बंद होतं. त्याने दारावर नॉक केलं. आतून काहीच प्रतिसाद नव्हता. सॅमने आता ते दार जोर जोराने बडविण्यास सुरवात केली. तरीही आतून काहीच प्रतिक्रिया नव्हती. सॅम आपल्या पुर्ण ताकदीनिशी त्या दाराला ढकलायला लागला. तो गोंधळलेला ऑपरेटरही आता त्याला ढकलण्यास मदत करु लागला.

जोर जोराने ढकलून आणि धक्के देवून शेवटी सॅमने आणि त्या ऑपरेटरने ते दार तोडले.

दार तुटताच सॅम आणि तो ऑपरेटर लगबगीने खोलीत शिरले. त्यांनी खोलीत चौफेर आपली नजर फिरवली. खोलीत कुणीच नव्हतं. त्यांनी एकमेकांकडे बघितलं. त्या ऑपरेटरच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव होते तर सॅमच्या चेहऱ्यावर अगम्य असे भितीदायक भाव उमटले होते.

अचानक वरुन काहीतरी खाली पडलं. दोघांनी दचकुन बघितलं. ती एक काळी मांजर होती, जिने वरुन उडी मारली होती. ती मांजर आता सॅमच्या अगदी समोर उभी राहाली आणि एकटक सॅमकडे पहायला लागली. अचानक ते आश्चर्याने तोंड वासून त्या मांजरीकडे पाहू लागले. हळू हळू त्या काळ्या मांजराचं रुपांतर नॅन्सीच्या सडलेल्या मृतदेहात होवू लागलं. त्या ऑपरेटरचे तर हातपाय लट लट कापत होते. सॅमही थीजल्यागत, पुतळ्यासारखा स्थिर जे त्याच्यासमोर घडत होतं ते पाहत होता. हळू हळू त्या सडलेल्या मृतदेहाचं रुपांतर एका सुंदर अशा तरुण स्त्रीमध्ये झालं. हो, ती नॅन्सीच होती. आता तिच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होतं. बघता बघता तिच्या डोळ्यांतून दोन मोठे टपोरे अश्रू घरंगळून तिच्या गालावर आले आणि हळू हळू ती तिथून अदृष्य होवून नाहीशी झाली.


- समाप्त -

Read more...

In the prison cell CH 52

डिटेक्टीव सॅम कारागृहात ऍंथोनीच्या समोर बसला होता. डिटेक्टिव सॅमला कशी सुरवात करावी काही कळत नव्हतं. शेवटी तो म्हणाला, '' मला इतके दिवसांचा प्रश्न पडला होता की ते सगळं नॅन्सीने मला का सांगावं?''

'' नॅन्सी? ... तुम्ही काय बोलत आहात... ती तर मेली''

'' ही जरा विचित्र आणि अद्भूत गोष्ट आहे ... पण तिचा आत्मा अजुन जिवंत आहे'' सॅम म्हणाला.

'' डिटेक्टीव सॅम ... तुम्ही हे काय बोलताय... तुम्ही माझी गंमत करताय?''

'' नाही मी जे काही बोलतो जे काय सांगतो आहे ते मी सगळं अनुभवलेलं आहे... तुझा विश्वास न बसनं साहजीक आहे... माझाही सुरवातीला विश्वास बसला नव्हता'' सॅम म्हणाला.

सॅम इतक्या गंभीरतेने बोलतो आहे हे पाहून ऍंथोनीने तो काय बोलतो आहे हे आधी ऐकून घ्यायचं ठरविलं.

'' तुला जेव्हा कोर्टात जजने शिक्षा सुनावली तेव्हा मला कळलं की नॅन्सीने ते सगळं सांगण्यासाठी माझी निवड का केली?'' सॅम म्हणाला.

'' काय सांगण्यासाठी?'' ऍंथोनीने विचारले.

'' की तुच त्या चार जणांना नॅन्सीचा आणि जॉनचा पत्ता दिला होता''

'' नाही मी नाही दिला'' ऍंथोनीने आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला.

'' खोटं बोलू नकोस'' सॅम आवाज चढवून म्हणाला.

ऍंथोनीने मान खाली घातली.

आता लपविण्यात काय अर्थ आहे?...

सजा तर आपल्याला झालीच आहे...

'' पण हे तुम्हाला कसं कळलं?'' ऍंथोनीने विचारले.

'' मला नॅन्सीनं सांगितलं'' सॅम म्हणाला.

'' पण ती तर मेली'' ऍंथोनी आश्चर्याने म्हणाला.

'' तिच्या आत्मानं ... तिच्या भूतानं सांगितलं मला'' सॅम म्हणाला.

ऍंथोनी त्याच्याकडे अविश्वासाने पाहत होता.

'' तिने मला यासाठी सांगितलं की माझ्यामार्फत तुला हे सगळं कळावं की जेही सगळे खुन झाले होते... ते प्रत्यक्षात तिने केले होते... आणि ते तु केलेले आहेत असा फक्त तिने भास निर्माण केला होता... आणि त्या खुनांबद्दल तुला जी सजा होत आहे ... ही तिचीच इच्छा असून अशा तऱ्हेने तिने तिचा तुझ्यावरचा बदला घेतला आहे''

'' अहो ... ते सगळे खुन मी माझ्या मांजरीच्या सहाय्याने ... .ते सगळं इलेक्टॉनिक्स, वायरलेस ट्रान्समिशन वैगेरे मी सगळं तयार केलं होतं...'' ऍंथोनी पोट तिडकीने म्हणाला.

'' पण जेव्हा मी तुझं ते इलेक्टॉनिक्स, वायरलेस ट्रॉन्समिशन तपासलं तेव्हा ते वेअरहाऊसच्या दरवाजाच्या बाहेर सुध्दा काम करत नव्हतं... तर मग त्या चौघांच्या घरापर्यंत ते सिग्नल पोहोचण्याचा प्रश्नच उद्भवत नाही'' सॅम म्हणाला.

'' एवढंच नाही तर तिने मला अशा काही गोष्टी सांगितल्या की त्या तुझ्या व्यतिरिक्त कुणालाही माहीत माहीत नाहीत ...' सॅम म्हणाला

'' जश्या?'' ऍंन्थोनीने विचारले.

'' जसं ... नॅन्सी आणि जॉनने, जेव्हा ते चौघंजण त्यांच्या मागावर होते आणि ते ड्रेनेज पाईपमध्ये लपले होते तेव्हा त्यांनी तुला केलेला फोन.... नंतर तु त्यांना एखादी टॅक्सी थांबवून हिल्टन हॉटेलला जाण्याचे सांगितलेले... आणि तु त्यांचा केलेला विश्वासघात... दोन दोन हजार डॉलर्स प्रत्येकाकडून घेण्याच्या बदल्यात तु त्यांना दिलेला त्यांचा पत्ता...आणि तु जेव्हा पैसे घेण्यासाठी गेला होता तेव्हा त्यांनी तुलाही या केसमध्ये अडकविण्याची दिलेली धमकी...'' सॅम एक एक करुन सगळं सांगत होता.

आता मात्र ऍंथोनी आ वासून सॅमकडे भितीमिश्रीत आश्चर्याने पाहत होता. एका मागे एक आश्चर्याचे धक्के त्याला बसत होते. तो विचार करायला लागला.

ही जी सगळी माहिती त्याने सांगितली होती ती त्याच्याव्यतिरिक्त अजुन कुणाला माहित होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता...

मग ह्या गोष्टी सॅम ला कशा कळल्या ?..

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फोनने त्या चार जणांना नॅन्सी आणि जॉनचा पत्ता कळविण्याची गोष्ट सॅमला कशी कळली ...

आणि आता तो म्हणतो सिग्नल ट्रान्समिशन दरवाजाच्या बाहेर सुध्दा पोहोचत नव्हतं...

ऍंथोनी आता गहन विचारात पडला होता.

त्याला सॅम म्हणतो त्यात तथ्य वाटायला लागलं होतं...

पण हे कसं शक्य आहे? ...

ऍंथोनीचा भूतावर आणि आत्म्यावर कधीच विश्वास नव्हता.

त्याला जाणवत होतं की कळत नकळत त्याच्या शरीरात कंप सुटतो आहे.

'' तुम्ही म्हणता हे जर खरं मानलं... तर तिने डायरेक्ट त्या चार जणांना आणि मग मला असं का मारलं नाही.. हा सगळा खेळ करण्याची काय गरज होती...'' अजुनही ऍंथोनीची खुमखुमी शिल्लक होती.

'' तिनं असं का केलं? हे तिचं तिला माहित... पण तिनेच त्या चार जणांना मारुन तुला त्यांच्या खुनांच्या आरोपात अडकविलं आहे एवढं मात्र खरं...'' सॅम म्हणाला.

ऍंथोनी आता अगदी गंभीर झाला होता. खुनाचा एक एक प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरुन जात होता. आणि प्रत्येक प्रसंगात आता त्याला नॅन्सीची अदृष्य उपस्थीती जाणवायला लागली होती.

'' पण मला एक कळत नाही... की तु कोर्टात तिचा बदला घेण्यासाठी त्यांना मारलं असं खोटं का सांगितलं?'' सॅमने शेवटी त्याच्या मर्मावर हात ठेवला होता.

ऍंथोनी गंभीर होता तो अजून गंभीर झाला. आता त्याचे डोळे हळू हळू पाणावू लागले होते.

त्याने सॅमचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याचा संयमाचा बांध तुटला. तो त्याच्या हातात आपलं डोकं खुपसून ओक्साबोक्शी रडू लागला.

'' तिचा खुन व्हावा अशी माही बिलकूल इच्छा नव्हती... पण त्या हरामखोरांनी तिला मारुन टाकलं... मी तिला प्रपोज केले आणि तिने मला नकार दिला होता... म्हणून तिचा गरुर तोडण्याची खुमखुमी माझ्या मनात बऱ्याच दिवसांची घर करुन होती होती ... आणि त्या दिवशी जॉनचा फोन आला आणि तो चान्स मला मिळाला... तिचा फक्त बलात्कार व्हावा आणि तिचा गर्व तुटावा एवढीच माझी इच्छा होती... पण नंतर वेगळ्याच गोष्टी होत गेल्या... तिचा खुन झाला... त्या चौंघांनी मलाही त्यात गोवण्याची धमकी दिली ... म्हणून मी त्या चौघांचा काटा काढण्याचं ठरविलं... आणि मग मी त्यांचा एक एक करुन खुन केला.... '' ऍंथोनी रडता रडता सगळं सांगु लागला होता.

सॅमला काय बोलावं काही कळत नव्हतं.

थोड्या वेळाने ऍंथोनी शांत झाला.

तेव्हा पुन्हा सॅमने विचारले, '' पण तु कोर्टात तिचा बदला घेण्यासाठी त्यांना मारलं असं खोटं का सांगितलं?''

पुन्हा रडकुंडी येवून ऍंथोनी म्हणाला, '' सांगतो ... पण प्लीज ते तुमच्यात आणि माझ्यातच ठेवा.. बाकी कुणाला कळता कामा नये''

'' ठिक आहे मी कुणालाच सांगणार नाही'' सॅमने आश्वासन दिले.

'' मी नॅन्सीसोबत जे केलं ते जर माझ्या घरच्यांना आणि साऱ्या जगाला कळलं तर त्यांच्यासमोर माझी काय इज्जत राहील... आता मला फाशी होत आहे... ती मी माझ्या प्रेमीकेचा बदला म्हणून केलेल्या खुनांबद्दल होत आहे असं चूकीचं समजून का होईना कमीत कमी त्यांच्या मनात माझ्याबद्दल एक आदर आणि इज्जत आहे... ती इज्जत मी मरेपर्यंत तरी कृपा करुन तशीच राहू द्या ...'' ऍंथोनीने आता सॅमचे पाय धरले होते.

सॅमला त्याची ही अशी अगतिक परीस्थिती पाहून त्याची किवही येत होती. त्याला काय करावे काही सुचत नव्हते.

पण नाही ... काहीही झालं तरी ऍंथोनीने केलेला गुन्हा हा क्षम्य नाही ....

त्याच्या डोक्यावर ठेवण्यासाठी पुढे केलेला हात त्याने तसाच मागे ओढून घेतला. ऍंथोनीने पकडलेले पायही त्याने मागे खेचून घेतले. तो उठला आणि जड पावलाने बाहेर जाण्यासाठी दरवाजाकडे गेला. चालता चालता दरवाजापाशी थांबला आणि मागे वळून ऍंन्थोनीला म्हणाला, "" नॅन्सीची तुला एक गोष्ट सांगण्याची इच्छा आहे''

'' कोणती?'' ऍंन्थोनीने आपले डोळे पुसत जड आवाजात विचारले.

'' की ती तुला कधीही माफ करु शकणार नाही''

सॅम तिथून भराभर मोठमोठे पावलं टाकीत निघून गेला होता आणि ऍंन्थोनी भितीने काळवंडलेल्या, रडवेल्या चेहऱ्याने त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता.


क्रमश:...

Read more...

Court Statement : CH 51

डिटेक्टिव्ह सॅम वेअरहाऊसमध्ये अजूनही जमिनीवर पडलेला होता. पण आता तो त्या ट्रान्स स्टेट मधून बाहेर आला होता. त्याने पटकन कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे बघितलं. आता कॉम्प्यूटर बंद होता. त्याने वेअरहाउसमध्ये आजुबाजुला बघितलं. आता बाहेर चागलं उजाडून सकाळ झाली होती त्यामुळं वेअर हाऊसमध्ये प्रकाश होता. मघाच्या वादळासारख्या हवेचे झोतही थांबले होते. तो आता उठून उभा राहाला आणि विचार करु लागला. तेवढ्यात त्याचं लक्ष खाली पडलेल्या मघा तुटलेल्या फोटो फ्रेमकडे गेलं. त्याने ती फ्रेम उचलली आणि सुलटी करुन बघितली. तो एक ग्रुप फोटो होता. ऍंथोनी आणि त्या चार खुन्यांचा.

त्याला आता एक एक गोष्ट एकदम स्पष्टपणे उलगडली होती. तो खाली पडलेला असतांना त्याच्या समोरुन जे एक एक दृष्य गेलं होतं ते सगळं कदाचित नॅन्सीच्या अदृष्य अतृप्त आत्माला त्याला सांगायचं होतं. पण तिला ते त्याला सांगायची जरुरत का पडावी? तिने त्याला न सांगताही तिला जे पाहिजे ते ते होत होतं. आणि पुढेही होणार होतं.

मग तिने हे त्याला का सांगाव?...

नक्कीच काहीतरी कारण असावं?...

नक्कीच तिचा काहीतरी उद्देश असावा...


ऍंथोनीच्या केसची बऱ्याच दिवसापासून कोर्ट मध्ये सुनावनी सुरु झाली होती. प्रत्येक वेळी सॅम कोर्टमध्ये बसून केसची कारवाई ऐकायचा. इकडे केसची कारवाई सुरु असायची आणि त्याच्या डोक्यात तो एकच प्रश्न घोळत असायचा की नॅन्सीने ते सगळं सांगण्यासाठी त्याची निवड का केली असावी? आणि तिने ते सगळं त्याला सांगण्याचं कारण काय असावं?

की ते सगळं त्याने कोर्टमध्ये सांगावं असं तर तिला वाटत नसावं?...

पण जर ते सगळं कोर्टमध्ये सांगितलं तर त्यावर कुणाचा विश्वास बसणार होता?...

उलट एका जिम्मेदार डिटेक्टीव्हच्या तोंडून अशा अंधश्रध्देच्या गोष्टी ऐकून लोकांनी त्याला खुळ्यात काढलं असतं...

खुळ्यातच नाही तर त्याच्या पुढील संपूर्ण करियरवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं...

तो विचार करीत होता. पण आज त्याला विचारात गुरफटायचं नव्हतं. आज त्याला कोर्टची कारवाई पुर्णपणे लक्ष देवून ऐकायची होती. कारण आज केसचा निकाल लागणार होता.

शेवटी इतक्या दिवसांपासून खोळंबलेल्या केसचे सर्व जाब जबाब झाले. सॅमचाही जाब झाला होता. त्याने जे पुराव्याने सिध्द होवू शकत होतं ते सगळं सांगितलं होतं.

शेवटी ती वेळ आली. ती घटका आली जिची सर्वजण मोठ्या आतूरतेने वाट पाहत होते - केसच्या निर्णयाची. सॅम आपल्या खुर्चीवर बसून जज काय निर्णय देतो हे एकण्यासाठी जजकडे पाहू लागला. तसे त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे भाव नव्हते. कोर्टरुमधील बाकी सर्व लोक श्वास रोखुन जजचा शेवटचा निर्णय ऐकण्यास उत्सुक होते.

जजने निर्णय सांगण्यास सुरवात केली -

'' सगळे पुरावे , सगळे जाबजवाब, आणि स्वत: मि. ऍंथोनी क्लार्कचं दिलेलं स्टेटमेंट लक्षात घेता कोर्ट या निश्कर्षापर्यंत पोहोचलं आहे की मि. ऍंथोनी क्लार्क हा मि. स्टिव्हन स्मिथ, मि. पॉल रोबर्टस, मि. रोनाल्ड पार्कर आणि मि. क्रिस्तोफर अंडरसन या चारही खुनांत दोषी आढळला आहे. त्याने हे चारही खुन जाणुन बुजून आणि योजनाबध्द रितीने अंमलात आणले होते.''

निर्णयावर शिक्कामोर्तब करण्या आधी जज ने एक मोठा पॉज घेतला. कोर्टमध्ये बसलेल्या लोकांवरुन आपली नजर फिरवली आणि मग पुढे आपला अंतिम निर्णय सुणावला -

'' ...म्हणून कोर्ट आरोपी ऍंथोनी क्लार्कला देहांताची शिक्षा सुनावीत आहे ''

जजने निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. या निर्णयावर जे चार खुन झाले होते त्यांचे नातेवाईक उपस्थीत होते त्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले तर बऱ्याच जणांना हा निर्णय आवडलेला नव्हता. नॅन्सीचा भाऊ जॉर्ज तर नाराजगी व्यक्त करीत कोर्टातून उठून गेला होता. पण डिटेक्टीव सॅमच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव उमटले नव्हते. ना आनंदाचे ना दु:खाचे. पण निर्णय सुनावल्याबरोबर सॅमला बऱ्याच दिवसापासून सतावित असलेले कोडे उलगडले होते.


क्रमश:...

Read more...

जेन्टलमन्स प्रामीस CH 46

क्रिस्तोफर आणि त्याचे तिन मित्र अजुनही वेड्यासारखे त्यांना शोधत होते. शेवटी शोधून शोधून थकल्यावर पुन्हा त्यांनी ज्या चौकातून त्यांना शोधण्याची सुरवात केली होती त्या चौकात क्रिस्तोफर आणि स्टिव्हन परत आले. त्यांच्या मागोमाग दम लागल्यामुळे मोठमोठे श्वास घेत रोनॉल्ड आला.

'' काय मिळाली? '' स्टीव्हनने विचारले.

रोनॉल्डने फक्त 'नाही' असं डोकं हलवलं.

'' साले कुठं मसनात गायब झाले?'' क्रिस्तोफर चिडून म्हणाला.

तेवढ्यात त्यांना दुरवर पॉल त्यांच्याकडे येतांना दिसला. त्यांनी आशेने त्याच्याकडे पाहाले. पण त्याने दूरुनच आपला अंगठा खाली करुन ते सापडले नसल्याचा इशारा केला.

'' लेकहो... वर तोंड करुन परत काय आलास... जा तिला शोधा... आणि जोपर्यंत ती सापडत नाही तो पर्यंत परत येवू नका'' क्रिस्तोफर त्यांच्यावर खेकसला.

तेवढ्यात क्रिस्तोफरच्या फोनची रिंग वाजली.

किस्तोफरने फोन उचलला आणि, '' हॅलो '' तो अनिच्छेनेच फोनमध्ये बोलला.

'' हे... मी ऍंथोनी बोलतोय... '' तिकडून नॅन्सी आणि जॉनचा वर्गमित्र ऍंथोनी बोलत होता.

'' हं बोल ऍंथोनी'' क्रिस्तोफर सपाट आवाजात म्हणाला. त्याच्या आवाजात त्याचा फोन आल्याचा आनंद तर नक्कीच नव्हता.

'' एक आनंदाची गोष्ट आहे... मी तुमच्यासाठी एक ट्रीट अरेंज केली आहे'' तिकडून ऍंथोनी म्हणाला.

'' हे बघ ऍंथोनी ... सध्या आमचा काही मुड ठिक नाही... आणि तुझी ट्रीट अटेंड करण्याइतका तर नक्कीच नाही'' क्रिस्तोफर म्हणाला.

'' अरे मग तर ही ट्रीट तुमचा मुड नक्कीच ठिक करेल ... ऐका तर खरं... एक नविन पाखरु आपल्या गावात आलं आहे... सध्याचं मी त्याला खास तुमच्यासाठी हिल्टन हॉटेलला पाठविलं आहे...'' ऍंथोनी तिकडून उत्साहाने म्हणाला.

'' पाखरु?... या गावात नविन... एक मिनीट ... एक मिनीट... ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत आहे का?'' क्रिस्तोफरने विचारले.

'' हो '' तिकडून ऍंथोनी म्हणाला.

'' तिच्या गालावर हसली म्हणजे खळी उमटते ?'' क्रिस्तोफरने विचारले.

'' हो'' तिकडून ऍंथोनी म्हणाला.

'' तिच्या उजव्या हातावर वाघाचा टॅटूसुद्धा आहे.. बरोबर'' क्रिस्तोफरच्या चेहऱ्यावर आनंद पसरायला लागला होता.

'' हो .. पण हे सगळं तुला कसं काय माहित?'' तिकडून ऍंथोनीने आश्चर्याने विचारले.

'' अरे तिच तर ती पोरगी आहे... रोनॉल्ड, पॉल, स्टीव आणि मी सकाळपासून तिच्या मागावर होतो... अन आत्ताच थोड्यावेळापूर्वी ती आम्हाला गुंगारा देवून सटकली आहे ... पण साली आमच्या नशिबातच दिसते''

सगळ्यांचे चेहरे एकदम आनंदाने उजळले होते. स्टीव्ह आणि पॉलच्या चेहऱ्यावर तर आनंद मावता मावत नव्हता.

'' खरंच?'' तिकडून ऍंथोनीसुध्दा आश्चर्याने म्हणाला.

'' दोस्ता ऍंथोनी... तु फार चांगलं काम केलंस लेका.. याला म्हणतात खरा दोस्त'' क्रिस्तोफरही आनंदाच्या भरात अनावर होवून बोलत होता.

'' अरे आत्ताच आम्ही तिला शोध शोध शोधत होतो... कुठाय ती?... तुला खरं सांगु आम्ही तुला तिच्या बदल्यात तुला जे पाहिजे ते देवू...'' क्रिस्तोफरने आनंदाच्या भरात त्याला शब्द दिला.

'' पहा बरं नंतर तु मुकरशील'' ऍंथोनी अविश्वासाने म्हणाला.

'' अरे नाही ... इट्स जेन्टलमन्स प्रामीस'' क्रिस्तोफर एखादा राजा जसा खुश होतो तसा खुश होवून म्हणाला.

'' दोन हजार डॉलर्स ... प्रत्येकाकडून... मंजूर'' ऍंथोनीनेही वेळेचा फायदा घ्यायचं ठरविलं.

'' मंजूर'' क्रिस्तोफर बेफिकीरपणे म्हणाला.


क्रमश:...

Read more...

Visit to George CH - 50

ऍंथोनीने या प्रकरणाचा संपूर्ण निकाल लावण्याचं आता मनावर घेतलं होतं. शेवटी त्याला त्याची चमडी वाचवणं आवश्यक होतं. काय करायचं हे आता त्याने मनाशी पक्क करुन ठेवलं होतं. पण त्या आधी एकदा नॅन्सीच्या भावाला जावून भेटायचं असं त्याने ठरविलं. तशी नॅन्सीचा वर्गमित्र या नात्याने त्याची जॉर्जशी ओळख होतीच. जॉर्जला पुर्ण प्रकरणाची कितपत माहिती आहे आणि त्याला माहिती कुठून मिळाली हे त्याला बघायचं होतं. आणि महत्वाचं म्हणजे जॉर्जला त्याच्यावर काही संशय तर नाही हे त्याला बघायचं होतं.

ऍंथोनी जॉर्जच्या दरवाजासमोर येवून उभा राहाला. तो आता बेल दाबणार तेवढ्यात त्याला एका मोठी कर्कश्य विचित्र किंकाळी ऐकू आली. एक क्षण तर तो दचकलाच... की काय झालं. त्याचा बेल दाबणारा हात भितीमुळे मागे खेचल्या गेला.

प्रकरण काहीतरी गंभीर दिसते...

म्हणून तो दाराची बेल न दाबता जॉर्जच्या घराच्या खिडकीजवळ गेला. त्याने आत डोकावून बघितले....


... आत जॉर्जने त्याच्या एका हातात एक बाहुलं पकडलेलं होतं. त्या बाहुल्याकडे द्वेशाने आणि रागाने पाहून पुन्हा त्याने एक विचित्र कर्कश्य किकांळी फोडली. ऍंथोनीला त्या किंकाळी नंतर झालेली शांतता एक वेगळीच, गुढ आणि भयानक शांतता वाटत होती.


ऍंथोनी अजूनही खिडकीतून हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होता. आत चाललेल्या सगळ्या प्रकारावरुन त्याला तो जादूटोण्याचा काहीतरी प्रकार असावा असं वाटत होतं. पण त्याचा जादूटोण्यावर विश्वास नव्हता. तो आतली एक एक गोष्ट निरखून पाहू लागला...


... आत आता जॉर्ज त्या बाहुल्याशी बोलू लागला, '' स्टिव्हन... आता तू मरण्यास तयार हो''

अचानक जॉर्जने आवाज बदलला आणि जणू तो त्या बाहुल्याच्या तोंडची वाक्य, ज्याला की तो स्टिव्हन समजत होता, बोलू लागला, '' नाही... मला मरायचं नाही आहे... जॉर्ज मी तुझी पाया पडून माफी मागतो... मला माफ कर... तु जे सांगशील ते मी करण्यास तयार आहे.. फक्त मला माफ कर...''

जॉर्ज पुन्हा पुर्ववत त्याच्या आवाजात त्याची वाक्य बोलू लागला, '' तु माझ्यासाठी काहीही करु शकतोस? ... तू माझ्या बहिणीला, नॅन्सीला परत आणू शकतोस काय?''

'' नाही ... ते मी कसे काय करु शकेन... ते माझ्या आवाक्याबाहेरचे आहे... ते सोडून तू काहीही सांग... मी तुला वचन देतो मी ते तुझ्यासाठी करीन... '' पुन्हा जॉर्ज आवाज बदलून त्या बाहुल्याच्या म्हणजे स्टिव्हनच्या तोंडची वाक्य बोलू लागला.

'' तू माझ्यासाठी काहीही करु शकतोस नं... तर मग तयार हो... मला तुझा जिव हवाय...'' जॉर्ज पुन्हा आवाज बदलून त्याची स्वत:ची वाक्य बोलू लागला..


खिडकीतून हा सगळा प्रकार ऍंथोनी बराच वेळ पाहत होता. ते बघता बघता अचानक त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याच्या चेहऱ्यावर आता एक आनंदाची अघोरी चूणूक दिसू लागली. तो खिडकीतून बाजूला झाला. दरवाजाजवळ गेला. त्याने काहीतरी विचार केल्यासारखे केले आणि तो तसाच जॉर्जच्या दरवाजाची बेल न वाजवताच परत फिरला.


क्रमश:...

Read more...

Neurology CH 49

ऍंथोनी कॉम्प्यूटरवर बसला होता. आणि एक काळी मांजर जिच्या गळ्यात काळा पट्टा बांधला होता ती त्याच्या आजुबाजुला खेळत होती. ज्या टबलवर कॉम्प्यूटर ठेवला होता त्या टेबलवर वायरचे तूकडे, मांजरीचे पट्टे, आणि काही इलेक्ट्रनिक्सचे छोटे छोटे उपकरणं इकडे तिकडे विखूरलेले होते. ऍंथोनीचं ज्या भिंतिकडे तोंड होतं त्या भिंतीवर न्यूरॉलॉजीच्या आणि ब्रेनच्या वेगवेगळ्या आकृत्या चिटकविलेल्या होत्या.

ऍंथोनीने विजेच्या चपळाईने कीबोर्डची आणि माऊसची काही बटनं दाबली आणि त्याच्या कॉम्प्यूटर स्क्रिनवर एक सॉफ्टवेअर ओपन झालं. त्या सॉफ्टवेअरचेही वेगवेगळे मेनु, वेगवेगळे बटन्स आणि टेक्स्ट बॉक्सेस दिसू लागले. त्या सॉफ्टवेअरच्या वेगवेगळ्या बटनांपैकी एका बटनवर ऍंथोनीने माऊसने क्लीक केलं. त्या बटनावर 'अटॅक' असं लिहिलं होतं. अचानक त्याच्या आजुबाजुला एका टेडीबिअरसोबत खेळणाऱ्या त्या मांजरीने उग्र रुप धारण केले आणि ती त्या टेडी बिअरवर तूटन पडली. इतक्या क्रुरतेने त्या मांजरीने त्या टेडी बिअरवर हल्ला केला की काही क्षणातच तिने त्या टेडी बिअरचे दाताने फाडून तोडून छोटे छोटे तूकडे केले. मांजर त्या टेडी बिअरवर हमला करीत असतांना ऍंथोनी मोठ्या कुतुहलाने त्या मांजरीकडे पाहत होता. जेव्हा शेवटी त्या मांजरीने त्या टेडी बिअरचा फज्जा पाडला, एक विजयी हास्य ऍंथोनीच्या चेहऱ्यावर पसरले.

तेवढ्यात अचानक ऍंथोनीला समोरच्या दाराजवळ कशाचा तरी आवाज झाल्याची चाहूल लागली. ऍंथोनी सगळं जसं च्या तसं सोडून समोरच्या दाराकडे गेला. दार उघडलं तर दारात अपेक्षेप्रमाने त्याला वर्तमानपत्र पडलेलं दिसलं. त्याने ते उचललं, ते वर्तमानपत्र चाळत घरात परत आला आणि ते वर्तमान पत्र चाळतच त्याने दार लावून घेतलं. अचानक वर्तमानपत्रातल्या एका बातमीने त्याचं लक्ष आकर्षीत केलं. तो ती बातमी गंभीरतेने वाचत त्याच्या कॉम्प्यूटर जवळ आला. तो खुर्चीवर बसला आणि ती बातमी काळजीपुर्वक वाचू लागला.

तो जी बातमी वाचत होता तीचं हेडींग होतं ' नॅन्सीच्या भावाने 'त्या' चौंघावर खटला भरला'.

आणि त्या हेडींगच्या खालीच क्रिस्तोफर, रोनॉल्ड, पॉल आणि स्टिव्हनचे फोटो होते. त्याने तो पेपर समोर टेबलवर कॉम्प्यूटरच्या शेजारी ठेवला आणि तो विचार करु लागला. नॅन्सीला त्या चौघांनी बलात्कार करुन मारल्यानंतर जेव्हा तो त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेला होता तेव्हाचा संवाद त्याला आठवला ....


'' तुम्ही त्या पोरीचा खुन केला की काय?'' ऍंथोनी कसाबसा बोलला.

'' तुम्ही नाही ... आपण ... आपण सगळ्यांनी '' क्रिस्तोफरने त्याची दूरुस्ती केली.

'' एक मिनीट... एक मिनीट... तुम्ही त्या पोरीला जर मारले असेल ,,, तर इथे कुठे माझा संबंध येतोय'' ऍंथोनी आपला बचाव करीत म्हणाला.

'' हे बघ.. जर पोलिसांनी आम्हाला पकडले... तर ते आम्हाला विचारतील ... की तुम्हाला पोरीचा पत्ता कुणी दिला?..'' रोनॉल्ड म्हणाला.

''... तर आम्ही काहीही न सांगण्याचं जरी ठरवलं तरी आम्हाला सांगावच लागणार...'' पॉलने उरलेलं वाक्य पुर्ण केलं.

'' ... की आम्हाला आमचा जिगरी मित्र ऍंथोनीने मदत केली'' पॉल दारुच्या नशेत बरळला.

'' हे बघा... तुम्ही मला विनाकारण अडकवित आहात'' ऍंथोनीने आता बचावाचा पावित्रा घेतला होता.

'' पण दोस्तहो... एक गंमत मात्र होणार आहे'' क्रिस्तोफर गालातल्या गालात हसत म्हणाला.

'' कोणती?'' रोनॉल्डने विचारले.

'' की पोलिसांनी आपल्याला पकडले आणि नंतर आपल्याला फाशी झाली...'' क्रिस्तोफरने मधे थांबून त्याच्या दोस्ताकडे पाहाले. ते एकदम सिरीयस झाले होते.

'' अबे ... लेकहो ... समजा आपल्याला फाशी झाली...'' क्रिस्तोफर स्टिव्हनच्या पाठीवर थाप देवून म्हणाला.

पॉलने दारुचा ग्लास डोक्यावर ठेवला आणि उठून उभा राहत एक गिरकी घेतली. पुन्हा एक गिरकी घेत हसत तो म्हणाला, '' हं ... हं समजा''

सगळेजण, फक्त ऍंन्थोनीला सोडून त्याच्यासोबत हसायला लागले.

पुन्हा खोलीतलं वातावरण पुर्ववत खेळीमेळीचं झालं.

'' हं तर समजा आपल्याला फाशी झाली ... तर आपल्याला त्याबद्दल काही खंत राहणार नाही... शेवटी आपण मिठाई खाल्लेली आहे... पण या बिचाऱ्या ऍंथोनीला मिठाईची साधी चवसुध्दा मिळाली नाही ... अन फुकटचच फासावर लटकावं लागणार...'' क्रिस्तोफर म्हणाला.

खोलीतले सगळेजण, फक्त एक ऍंन्थोनी सोडून जोर जोराने हसायला लागले.


..... ऍंथोनी आपल्या विचारांच्या तंद्रीतून भानावर आला.

आता ही केस जर अशीच पुढे चालली तर केव्हा ना केव्हा क्रिस्तोफर, रोनॉल्ड, पॉल आणि स्टिव्हन आपलं नाव घेतील...

मग आपणही या केसमधे अडकल्या जावू....

नाही असं होता कामा नये....

आपल्याला यातून काही तरी मार्ग काढायलाच पाहिजे...

विचार करता करता ऍंथोनी त्याच्या आजुबाजुला खेळणाऱ्या मांजरीकडे पाहत होता. अचानक एक विचार त्याच्या डोक्यात चमकून गेला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गुढ हास्य दिसायला लागलं.

आपण या चौघांचाही काटा काढला तर?...

ना रहेगा बास न बजेगी बांसुरी...


क्रमश:...

Read more...

Treat CH 48

क्रिस्तोफर, रोनॉल्ड, पॉल, स्टिव्हन आणि ऍंथोनी टेबलभोवती बसून व्हिस्कीचे ग्लासवर ग्लास रिचवित होते. क्रिस्तोफर आणि त्याचे तिन दोस्त पिऊन टून्न झाले होते. ऍंथोनी आपला जपूनच पित होता.

'' मग ऍंथोनी ... इतक्या रात्री इकडे कुठे फिरतोय'' स्टिव्हन ऍंथोनीच्या पाठीवर थाप देवून म्हणाला.

त्याला चांगलीच चढलेली दिसत होती.

'' खरं म्हणजे मी तुमच्याकडे त्या ट्रीटच्या संदर्भात आलो होतो'' ऍंथोनी संधी साधून मुळ मुद्यावर आला.

'' कोणती ट्रीट?'' पॉल म्हणाला.

एक तर त्याच्या लक्षात आले नव्हते किंवा तो तसं भासवित असावा.

'' अबे येड्या... तो त्या पोरीबद्दल बोलतोय'' ऍंथोनी स्पष्ट करण्याच्या आधीच रोनॉल्ड मध्ये बोलला.

'' बाय द वे... ट्रीटची तुम्हाला मजा आली की नाही'' ऍंथोनीने विचारले.

सगळेजण एकदम स्तब्ध, शांत आणि सिरीयस झाले. ऍंथोनी गोंधळून त्यांच्या चेहऱ्याकडे बघायला लागला.

'' हे बघ... तुझी ट्रीट सुरवातीला चांगली होती... पण नंतर शेवटी...''

'' ते होतं ना एखाद्या वेळेस की सुप सुरवातीला चांगलं लागतं पण शेवटी बुडात साठलेल्या मिठामुळं त्याच्या चवीचा मजा किरकीरा होतो...'' रोनॉल्ड क्रिस्तोफरचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच म्हणाला.

'' तुम्ही लोक काय बोलता आहात मला काही समजत नाही आहे'' ऍंथोनी त्यांच्या चेहऱ्याकडे गोंधळून पाहात म्हणाला.

स्टिव्हनने क्रिस्तोफरकडे पाहत विचारले, '' सांगायचं का याला?''

'' अरे का नाही... त्याला माहित करुन घ्यायचा हक्क आहे... शेवटी त्या कृत्यात तो आपला पार्टनर होता..'' क्रिस्तोफर म्हणाला.

'' कृत्य ? ... कसलं कृत्य?'' ऍंथोनीने न राहवून विचारले.

'' खुन'' रोनॉल्ड थंडपणे म्हणाला.

'' ए त्याला खुन नको म्हणू .. तो एक ऍक्सीडेंट होता'' पॉल मधेच बोलला.

ऍंथोनीचा चेहरा भितीने पांढरा फटक पडला.

'' तुम्ही त्या पोरीचा खुन केला की काय?'' ऍंथोनी कसाबसा बोलला.

'' तुम्ही नाही ... आपण ... आपण सगळ्यांनी '' क्रिस्तोफरने त्याची दूरुस्ती केली.

'' एक मिनीट... एक मिनीट... तुम्ही त्या पोरीला जर मारले असेल ,,, तर इथे कुठे माझा संबंध येतोय'' ऍंथोनी आपला बचाव करीत म्हणाला.

'' हे बघ.. जर पोलिसांनी आम्हाला पकडले... तर ते आम्हाला विचारतील ... की तुम्हाला पोरीचा पत्ता कुणी दिला?..'' रोनॉल्ड म्हणाला.

''... तर आम्ही काहीही न सांगण्याचं जरी ठरवलं तरी आम्हाला सांगावच लागणार...'' पॉलने उरलेलं वाक्य पुर्ण केलं.

'' ... की आम्हाला आमचा जिगरी मित्र ऍंथोनीने मदत केली'' पॉल दारुच्या नशेत बरळला.

'' हे बघा... तुम्ही मला विनाकारण अडकवित आहात'' ऍंथोनीने आता बचावाचा पावित्रा घेतला होता.

'' पण दोस्तहो... एक गंमत मात्र होणार आहे'' क्रिस्तोफर गालातल्या गालात हसत म्हणाला.

'' कोणती?'' रोनॉल्डने विचारले.

'' की पोलिसांनी आपल्याला पकडले आणि नंतर आपल्याला फाशी झाली...'' क्रिस्तोफरने मधे थांबून त्याच्या दोस्ताकडे पाहाले. ते एकदम सिरीयस झाले होते.

'' अबे ... लेकहो ... समजा आपल्याला फाशी झाली...'' क्रिस्तोफर स्टिव्हनच्या पाठीवर थाप देवून म्हणाला.

पॉलने दारुचा ग्लास डोक्यावर ठेवला आणि उठून उभा राहत एक गिरकी घेतली. पुन्हा एक गिरकी घेत हसत तो म्हणाला, '' हं ... हं समजा''

सगळेजण, फक्त ऍंन्थोनीला सोडून त्याच्यासोबत हसायला लागले.

पुन्हा खोलीतलं वातावरण पुर्ववत खेळीमेळीचं झालं.

'' हं तर समजा आपल्याला फाशी झाली ... तर आपल्याला त्याबद्दल काही खंत राहणार नाही... शेवटी आपण मिठाई खाल्लेली आहे... पण या बिचाऱ्या ऍंथोनीला मिठाईची साधी चवसुध्दा मिळाली नाही ... अन फुकटचच फासावर लटकावं लागणार...'' क्रिस्तोफर म्हणाला.

खोलीतले सगळेजण, फक्त एक ऍंन्थोनी सोडून जोर जोराने हसायला लागले.

'' खरं म्हणजे मी इथे तुमच्या प्रत्येकाकडून दोन दोन हजार डॉलर्स घ्यायला आलो होतो'' ऍंथोनी म्हणाला.

'' दोन दोन हजार डॉलर्स ? ... मित्रा आता ते सगळं विसर... '' रोनॉल्ड म्हणाला.

ऍंथोनी त्याच्याकडे रागाने बघायला लागला.

'' हे बघ जर सगळं काही व्यवस्थीत झालं असतं तर आम्ही तुला स्वखुशीने पैसे दिले असते.. पण आता परिस्थीती वेगळी आहे... ती पोरगी मारल्या गेली आहे..'' रोनॉल्ड त्याला समजावल्यागत म्हणाला.

'' .. म्हणजे अपघातात..'' स्टिव्हनने मधेच जोडले.

'' तर आता ते सगळं निपटविण्यासाठी पैसा लागणार...'' रोनॉल्ड म्हणाला.

'' खरं म्हणजे... आम्हीच तुझ्याजवळ ते सगळं निपटविण्यासाठी आता पैसे मागणार होतो'' पॉल म्हणाला.

पुन्हा सगळेजण, ऍंथोनीला सोडून, जोर जोराने हसायला लागले. आधीच त्यांना चढली होती आणि ते आता त्याची उडवल्यागत हसत होते.

ऍंथोनीचे जबडे आवळल्या गेले. रागाने तो उठून उभा राहाला आणि तरातरा पाय आपटत तिथून निघून गेला. दरवाजातून बाहेर पडल्यावर त्याने दार रागाने जोरात आपटत ओढून घेतले होते.


क्रमश:...

Read more...

Cheers! CH-47

क्रिस्तोफर, रोनॉल्ड, पॉल आणि स्टीव्हन एका जुनाट घरात एका टेबलभोवती बसले होते. त्यांच्या हातात अर्धे अर्धे रिचविलेले व्हिस्कीचे ग्लासेस होते. चौघंही आपआपल्यातच गुंग विचार करीत व्हिस्की पित होते. त्यांच्यात एक तणावपुर्ण शांतता पसरलेली होती.

'' तिला तु का मारलं?'' रोनॉल्डने शांततेचा भंग करीत क्रिस्तोफरला प्रश्न विचारला.

तशी चौघांपैकी कुणाचीच क्रिस्तोफरला जाब विचारण्याची छाती नव्हती. पण वेळच तशी आली होती. आणि पिल्यामुळे त्याला तेवढी हिंम्मतही आली होती.

'' ए मुर्खासारखा बरळू नकोस... मी काही तिला मारलं नाही... ती अपघाताने मेली'' क्रिस्तोफर बेफिकीरपणे खांदे उडवून म्हणाला.

'' अपघाताने?''

क्रिस्तोफर जरी आपण त्याबाबतीत बेफिकीर आहे असं दाखवित असला तरी तोही आतून अस्वस्थ होता.

आपली अस्वस्थता लपविण्यासाठी त्याने व्हिस्कीचा एक मोठा घोट घेतला, '' हे बघा ती जरा जास्तच आवाज करीत होती म्हणून मी तिचं तोंड दाबलं आणि मला माहितच नव्हतं की त्यात तिचं नाक सुध्दा दाबलं गेलं आहे म्हणून''

'' मग आता आपण काय करायचं?'' स्टिव्हनने विचारले.

त्या चौघांमध्ये स्टिव्हन आणि पॉल सगळ्यात जास्त भ्यालेले दिसत होते.

'' आणि पोलिसांनी जर आपल्याला पकडलं तर?'' पॉलने आपली भिती व्यक्त केली.

'' हे बघा काहीही झालं नाही असं वागा... आणि कुणी काही विचारलंच तर लक्षात ठेवा आपण इथेच काल रात्रीपासून पत्ते खेळत आहोत ... आणि तरीही जर काही भानगड झाली तर आपण त्यातूनही काहीतरी मार्ग काढू... अन ही काय माझी पहिली वेळ नाही ...की मी कुणाला मारलं आहे'' क्रिस्तोफर आत्मविश्वासाचा आव आणीत म्हणाला.

'' पण ते तू मारलं आहेस ... आणि तेव्हा तुला त्यांना मारायचं होतं'' रोनॉल्ड म्हणाला.

'' त्याने काय फरक पडतो... मारणं आणि अपघाताने मरणं... शेवटी मरण ते मरणच'' क्रिस्तोफर म्हणाला.

तेवढ्यात दरवाजावर कुणाचीतरी चाहूल लागली; कुणीतरी हळूच नॉक केलं.

सगळे बोलण्याचं आणि पिण्याचं थांबवून एकदम स्तब्ध झाले.

त्यांनी एकमेकांकडे बघितलं.

कोण असेल?...

पोलिस तर नसावे?...

खोलीत एकदम शांतता पसरली होती.

क्रिस्तोफरने स्टीव्हनला कोण आहे हे बघण्यासाठी खुणावले.

स्टीव्हन हळूच पावलांचा आवाज न होवू देता दरवाजाजवळ गेला. बाहेर कोण आहे याचा अंदाज घेतला आणि हळूच दरवाजा उघडून बाहेर डोकावून बघू लागला. समोर ऍंथोनी होता. स्टिव्हनने त्याला आत येण्यास खुणावून आत घेतले. जसा ऍंथोनी आत आला त्याने पुन्हा दरवाजा लावून घेतला.

रोनॉल्डने अजुन एक व्हिस्कीचा ग्लास भरीत म्हटले, '' अरे.. ये बस... जॉइन अवर कंपनी''

ऍंथोनी रोनॉल्डने ऑफर केलेला ग्लास घेत त्यांच्यासोबत टेबलभोवती बसला.

'' चिअर्स'' रोनॉल्ड त्याच्या ग्लासला आपला ग्लास अलगद लावित म्हणाला.

'' चिअर्स'', ऍंन्थोनीने तो ग्लास आपल्या तोंडाला लावला आणि तोही त्यांच्या कंपनीत सामिल झाला.


क्रमश:...

Read more...

CH 45 अश्रू बोलू लागले

वेअरहाऊसमध्ये मॉनिटरच्या समोर खाली अचेतन अवस्थेत पडलेल्या सॅमच्या समोरुन जणू एक एक प्रसंग फ्लॅशबॅकप्रमाणे जावू लागला....


.... नॅन्सी आणि जॉन एका रस्त्याचा बाजूला पडलेल्या ड्रेनेज पाईपमध्ये लपले होते. तेवढ्यात अचानक त्यांना त्यांच्याकडे धावत येणारा पावलांचा आवाज आला. ते आता तिथून हलूही शकत नव्हते. ते जर सापडले तर पुर्णपणे त्यांच्या तावडीत आयतेच सापडणार होते. त्यांनी मांजरासारखे घट्ट डोळे मिटून जेवढं शक्य होईल तेवढं बारीक होण्याचा प्रयत्न केला. त्याव्यतिरिक्त ते करु तरी काय शकत होते?

अचानक त्यांच्या लक्षात आलं की त्या पाठलाग करणाऱ्यांपैकीच एक जण धावत येवून अगदी पाईप जवळ पोहोचला होता. तो जवळ येताच जॉन आणि नॅन्सी अगदी शांत जवळ जवळ श्वास रोखून काहीही हालचाल न करता तसेच बसून लपून राहाले. तो आता अगदी पाईपजवळ पोहोचला होता.

तो त्या चौघांपैकी स्टीव्हन होता. त्याने आजूबाजूला बघितले.

'' साले कुठं गायब झालेत?'' तो स्वत:शीच चिडून म्हणाला.

तेवढ्यात स्टीव्हनचं पाईपकडे लक्ष गेलं.

नक्कीच साले या पाईपमध्ये लपले असतील...

त्याने विचार केला. तो पाईपच्या अजून जवळ गेला. तो आता वाकुन पाईपमध्ये पाहणार तेवढ्यात...

'' स्टीव... लवकर इकडे ये'' तिकडून क्रिस्तोफरने त्याला आवाज दिला.

स्टीव्हन पाईपमध्ये वाकुन पाहता पाहता थांबला, त्याने आवाज आला त्या दिशेला बघितले आणि वळून तो धावतच त्या दिशेला निघाला.

जाणाऱ्या पावलांचा आवाज येताच नॅन्सी आणि जॉनने सुटकेचा श्वास सोडला.

स्टीव्हन जाताच जॉनने आपल्या खिशातून मोबाईल काढला. त्याने कुणी त्याला ट्रेस करु नये म्हणून फोन स्वीच ऑफ करुन ठेवलेला होता. त्याने तो स्वीच ऑन केला आणि एक नंबर डायल केला.

'' कुणाला फोन करतोस?'' नॅन्सीने दबक्या आवाजात विचारले.

'' आपला क्लासमेट ऍंन्थोनी... तो इथलाच राहणारा आहे''

तेवढ्यात फोन लागला, '' हॅलो''

'' अरे काय जॉन कुठून बोलतोस... सालेहो तुम्ही कुठं गायब झालां... इथं केवढी बोंबाबोंब झाली आहे...'' तिकडून ऍंथोनी म्हणाला.

जॉनने त्याला थोडक्यात सगळं सांगितलं आणि मग म्हणाला, '' अरे आम्ही इथे एका जागी अडकलो आहोत...''

'' अडकले? कुठं.?'' ऍंन्थोनीने विचारले.

'' अरे काही गुंड आमचा पाठलाग करीत आहेत... आम्ही आता कुठं आहो हे मला सांगता येणार नाही...'' जॉन सांगु लागला. तेवढ्यात नॅन्सीने त्याला खुणवून घड्याळ्याच्या टॉवरकडे इशारा केला.

'' ... हं इथून एक घड्याळाचा टॉवर दिसतो आहे...त्याच्याच जवळपास आम्ही आहोत'' जॉनने त्याला माहिती पुरवलीं.

'' अच्छा... अच्छा... काळजी करु नका, आधी आपलं डोकं शांत करा... आणि एवढ्या मोठ्या शहरात ते गुंड तुम्हाला काही करु शकतील ही भीती मनातून काढून टाका... हं काढली भिती"' तिकडून ऍंन्थोनी म्हणाला.

'' हो...'' जॉन म्हणाला.

'' हं गुड... आता एखादी टॅक्सी पकडा आणि त्याला हिल्टन हॉटेल असं सांगा... ते तिथेच जवळपास त्याच एरियात आहे...''

तेवढ्यात त्यांना इतका वेळपासून एक वाहन दिसलं नव्हतं, सुदैवाने एक टॅक्सी त्यांच्याकडे येतांना दिसली.

'' टॅक्सी आली आहे... बरं तुला मी नंतर फोन करतो... '' जॉनने घाईने फोन कट केला.

ते दोघंही घाईघाईने पाईपच्या बाहेर आले आणि जॉनने टॅक्सीला हात केला. टॅक्सी थांबली तशी ते दोघंही टॅक्सीत घुसले.

'' हॉटेल हिल्टन'' जॉन म्हणाला तशी टॅक्सी पुन्हा धावू लागली.

टॅक्सी निघाली तसं दोघांनाही हायसं वाटलं. त्यांनी सुटकेचा श्वास सोडला.


क्रमश:...

Read more...

CH 44 वाऱ्याचा झोत

गोंधळलेल्या डिटेक्टिव सॅमने हळू हळू वेअरहाऊसमध्ये प्रवेश केला. आत आल्यावर इकडे तिकडे बघत तो त्या मांजरीचा शोध घेवू लागला. आधीच अंधार आणि वर ती मांजर काळ्या रंगाची. सापडणं कठिण होतं. त्याने पुर्ण वेअरहाऊसमध्ये आपली भिरभिरती नजर फिरविली. आता बाहेर उजेडायला आलं होतं त्यामुळे वेअरहाऊसमध्ये थोडा थोडा उजेड आला होता. एका जागी त्याला एक फाईलचा गठ्ठा धूळ खात पडलेला दिसला. तो त्या फाइल्सच्या गठ्ठ्याजवळ गेला. त्या फाईल्स थोड्या उंचावर एका फळीवर ठेवल्या होत्या. त्याची उत्सुकता चाळवली गेली होती.

कशाच्या असतील त्या फाईल्स...

नक्कीच अजून केसच्या संदर्भात महत्वाचं काहीतरी आपल्याला त्या फाईल्समध्ये सापडू शकते..

तो पाय उंच करुन त्या फाईल्सच्या गठ्ठ्यापर्यंत आपला हात पोहोचविण्याचा प्रयत्न करु लागला. तरीही त्याचा हात पुरत नव्हता. म्हणून आता तो उडी मारून फाईल्स पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करु लागला. त्या फाईल्सपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात त्याचा धक्का लागून फळीवरुन काहीतरी खाली पडले. काच फुटण्यासारखा आवाज झाला. त्याने खाली वाकुन पाहाले तर काचाचे तूकडे सगळीकडे विखूरले होते. आणि खाली फोटोची एक फ्रेम उलटी पडलेली होती. त्याने ती उचलली आणि सरळ करुन बघितली. तो एक ग्रुप फोटो होता पण तिथे उजेड फारच अंधूक असल्यामुळे काही व्यवस्थीत दिसत नव्हते. तो फोटो घेवून तो कॉम्प्यूटरजवळ गेला. काम्प्यूटरचा मानिटर अजूनही सुरु होता आणि चमकत होता. त्यामुळे त्या उजेडात तो फोटो व्यवस्थीत पाहाणं शक्य होतं. मॉनिटरच्या उजेडात त्याने तो ग्रुप फोटो पाहाला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तो आ वासून आश्चर्याने त्या फोटोकडे पाहत होता.

तो त्या धक्यातून सावरतो न सावरतो तोच त्याच्या समोर सुरु असलेलं कॉम्प्यूटरचं मॉनिटर बंद सुरु होवू लागलं.

काहीतरी इलेक्ट्रीक प्रॉब्लेम दिसतो...

म्हणून तो कॉम्प्यूटरचा पॉवर स्वीच आणि प्लग चेक करायला गेला.

त्याने पॉवर प्लगकडे बघितले आणि दचकून भ्यालेल्या स्थितीत तो मागेच सरला. त्याला आश्चर्याचा दूसरा धक्का बसला होता.

कॉम्प्यूटरचं पॉवर केबल पॉवर बोर्डला न लावता तिथेच बाजूला काढून ठेवलेलं होतं.

तरीही कॉम्प्यूटर सुरु कसा? ...

ही काहीतरी ट्रीक असावी...

किंवा हे पॉवर केबल दुसरंच कशाचं तरी असावं...

त्याने ते पावर केबल उचलून एका टोकापासून दूसऱ्या टोकापर्यंत चाचपडून पाहालं. ते कॉम्प्यूटरचंच पॉवर केबल होतं.

आता मात्र त्याचे हातपाय कापायला लागले होते.

तो जे पाहत होता तसे त्याने त्याच्या उभ्या आयुष्यात कधीही पाहाले नव्हते.

अचानक कॉम्प्यूटरचा मॉनिटर बंद चालू होण्याचे थांबले. त्याने मॉनिटरकडे पाहाले. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही भितीमिश्रीत आश्चर्य होतं.

अचानक एक मोठा वाऱ्याची झोत झपाटल्यासारखा वेअरहाऊसमध्ये वाहू लागला. एवढा वाऱ्याचा झोत वाहत होता आणि सॅमच्या सर्वांगाला दरदरुन घाम फुटला होता.

आणि आता अचानक मॉनिटरवर चित्र विचित्र वेगवेगळ्या भयानक आकृत्या अवतरायला लागल्या.

डिटेक्टीवला काही एक समजत नव्हतं की काय होत आहे. जे काही घडत होतं ते त्याच्या अवकलन शक्तीच्या आवाक्या बाहेरचं होतं. शेवटी एक सुंदर स्रिची आकृती मॉनिटरवर अवतरली. ती आकृती जरी सुंदर आणि मोहक होती तरी सॅमच्या शरीरात एक भितीची लहर पसरली. ती सुंदर आकृती आता एका भयानक आकृतीत परिवर्तीत झाली. पुन्हा हवेचा एक मोठा झोत आला. यावेळी त्या हवेची तिव्रता फारच जास्त होती. एवढी की त्या हवेच्या माऱ्याने अक्षरश: सॅम खाली पडला. तसे त्याचे हातपाय आधीच गळून गेले होते. त्या हवेच्या माऱ्याचा प्रतिकार करण्याची शक्ती त्याच्यात उरली नव्हती. खाली पडल्या पडल्या त्याच्या लक्षात आले की हळू हळू त्याची शुद्ध हरपत आहे. मात्र त्याची शुध्द पुर्णपणे हरविण्याच्या आधी त्याने मॉनिटरवरच्या त्या स्त्रीच्या डोळ्यातून दोन मोठमोठे अश्रु ओघळतांना पाहाले.


क्रमश:...

Read more...

CH 43 Signal Receiver

This is a Horror Suspense Thriller Novel based on my original English Screenplay 'Latched'. The screenplay is registered with Film Writters Association Mumbai.
बेड्या घातलेला ऍंथोनी पोलिसांच्या गराड्यात वेअरहाऊसमधून बाहेर पडला. त्याच्यासोबतचे सगळे हत्यारबंद पोलिस होते कारण तो कुणी साधासुधा गुन्हेगार नसून एका पाठोपाठ एक असे चार खुन केलेला सिरियल किलर होता. पोलिसांनी ऍन्थोनीला त्यांच्या एका गाडीत बसविले. डिटेक्टीव्ह सॅम वेअरहाऊसच्या दरवाजाजवळ मागेच थांबला. सॅमने आत्तापर्यंन कितीतरी खुनाच्या केसेस हाताळल्या असतील पण तो या घटनेमुळे विचलीत झालेला दिसत होता. खुन्याला पकडण्याचे महत्वाचे काम तर आता पार पडले होते. त्यामुळे आता त्यांच्यासोबत गाडीत बसून जाणे त्याला आवश्यक वाटत नव्हते. तो काही काळ तरी एकट्यात घालू इच्छीत होता. आणि त्याला मागे थांबून एकदा या वेअरहाऊसचीही कसून तपासणी करायची होती. त्याने त्याच्या एका साथीदाराला इशारा केला,

'' तुम्ही याला घेवून समोर व्हा ... मी थोड्याच वेळात तिथे पोहोचतो'' सॅम म्हणाला.

ज्या गाडीत ऍंन्थोनीला बसविले होते ती गाडी सुरु झाली. तिच्या मागे पोलिसांच्या इतर गाड्याही सुरु झाल्या, आणि ऍंन्थोनी ज्या गाडीत बसला होता तिच्या मागे वेगात धावू लागल्या. एक मोठा धुळीचा लोट उठला. त्या गाड्या निघून गेल्या तरी तो धूळीचा लोट अजूनही हवेत पसरलेला होता. सॅम गंभीर चेहऱ्याने त्या धुळीच्या ढगाला हळू हळू विरतांना आणि खाली बसतांना पाहत होता.

जशा सगळ्या गाड्या तिथून निघून गेल्या आणि वातावरण शांत झालं सॅमने वेअरहाऊसच्या भोवती एक चक्कर मारली. चालता चालता त्याने आकाशाकडे बघितले. आकाशात तांबडं फुटलं होतं आणि आता थोड्याच वेळात सुर्य उगवणार होता. तो एक चक्कर मारुन दरवाजाजवळ आला आणि शिथील चालीने वेअरहाऊसच्या आत गेला.

आत वेअरहाऊसमध्ये अजूनही अंधारच होता. त्याने कॉम्प्यूटरच्या चमकणाऱ्या मॉनिटरच्या प्रकाशात वेअरहाऊसमध्ये एक चक्कर मारली आणि मग त्या कॉम्प्यूटरजवळ जावून उभा राहाला. सॅमने बघितलेकी कॉम्प्यूटरवर एक सॉफ्टवेअर अजूनही ओपन केलेले होते. त्याने सॉफ्टवेअरच्या वेगवेगळ्या ऑपशन्सवर माऊस क्लिक करुन बघितले. एका बटनवर क्लिक करताच कॉम्प्यूटरच्या बाजुला ठेवलेल्या एका उपकरणाचा लाईट ब्लींक होवू लागला. त्याने ते उपकरण हातात घेवून न्याहाळून पाहाले. ते एक सिग्नल रिसिव्हर होते, ज्यावर एक डिस्प्ले होता. त्या डिस्प्लेवर एक मेसेच चमकायला लागला. लिहिलेलं होतं ' इन सिग्नल रेंज / इन्स्ट्रक्शन = लेफ्ट'. त्याने ते उपकरण परत ठेवून दिलं. त्याने अजुन एक सॉफ्टवेअरचं बटन दाबलं, ज्यावर 'राईट' असं लिहिलं होतं.

पुन्हा सिग्नल रिसीव्हर ब्लींक झाला आणि त्यावर मेसेज आला ' इन सिग्नल रेंज / इन्स्ट्रक्शन = राईट'. पुढे त्याने ' अटॅक' बटन दाबलं. पुन्हा सिग्नल रिसीव्हर ब्लींक झाला आणि त्यावर मेसेज आला होता ' इन सिग्नल रेंज / इन्स्ट्रक्शन = अटॅक'. सॅमने ते उपकरण पुन्हा हातात घेतले आणि आता तो ते काळजीपुर्वक न्याहाळू लागला. तेवढ्यात त्याला वेअरहाऊसच्या बाहेर कशाचा तरी आवाज आला. ते उपकरण तसंच हातात घेवून तो बाहेर गेला.

वेअरहाऊसच्या बाहेर जावून त्याने आजुबाजूला बघितले.

इथे तर कुणीच नाही...

मग कशाचा आवाज झाला होता...

असेल काहीतरी जावूद्या ...

जेव्हा तो पुन्हा परत वेअरहाऊसमध्ये येण्यासाठी वळला तेव्हा अनायसेच त्याचं लक्ष त्याच्या हातातल्या ब्लींक होणाऱ्या उपकरणाकडे गेलं. अचानक त्याचा चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. त्या सिग्नल रिसीव्हरवर ' आऊट ऑफ रेंज / इन्स्ट्रक्शन = निल' असा मेसेज आला होता. तो आश्चर्याने त्या उपकरणाकडे पाहत होता. त्यांच तोंड उघडं ते उघडंच राहालं होतं. त्याच्या डोक्यांत वेगवेगळ्या प्रश्नांनी गर्दी केली होती.

अचानक आजुबाजुला कुणाच्या तरी उपस्थीतीने तो जवळ जवळ दचकलाच. पाहतो तर ती एक काळी मांजर होती आणि त्याच्या समोरुन पळत वेअरहाऊसमध्ये गेली होती. एकदा त्याने आपल्या हातातल्या उपकरणाकडे पाहाले आणि नंतर त्या वेअर हाऊसच्या उघड्या दाराकडे बघितले. ज्यातून आताच एक काळी मांजर आत गेली होती.

हळू हळू काळजीपूर्वक त्या मांजरीचा पाठलाग करीत तो आता आत वेअर हाऊसमध्ये जावू लागला.

जाता जाता त्यांच्या डोक्यात एक विचार सारखा घोंगावत होता की 'जर वेअरहाऊसच्या बाहेरपर्यंतसुध्दा सिग्नल जाऊ शकत नसेल तर मग ज्या चार जणांचे खुन झाले त्यांच्या घरापर्यंत सिग्नल पोहोचलाच कसा ?'


क्रमश:...

Read more...

CH 42 सहानुभूती

संध्याकाळची वेळ होती. पार्कमध्ये बसलेल्या प्रेमी जोडप्यांसोबत बागेतील फुलंही जणू थंड हवेच्या झुळकेबरोबर मस्तीत डोलत होते. त्या पार्कच्या एका कोपऱ्यात नॅन्सी खाली गवतावर एका मोठ्या झाडाच्या बुंध्याचा आधार घेवून, टेकून बसली होती. जॉन आपलं डोकं नॅन्सीच्या मांडीवर ठेवून खाली गवतावर पहुडला होता.

'' तुला माहित नाही मी तुझ्यावर किती प्रेम करते'' ती त्याच्या केसांतून हात फिरवीत त्याला गोंजारत म्हणाली.

त्याने एक प्रेमळ दृष्टीक्षेप तिच्याकडे टाकला.

काही वेळ दोघंही काहीच बोलले नाहीत. बराच वेळ नुसता शांततेत गेला. काही वेळाने अचानक जॉन उठून उभा राहाला आणि नॅन्सीला उठण्यासाठी हात देत म्हणाला, '' चल आता निघूया ... बराच वेळ झाला आहे''

त्याचा हात पकडून ती उठून उभी राहाली.

हातात हात घालून ते संथपणे चालत तिथून निघून गेले.

इतका वेळ एका झाडाच्या मागे दबा धरुन बसलेला ऍन्थोनी नॅन्सी आणि जॉन तिथून निघून जाताच बाहेर आला. त्याचा चेहरा रागाने लाल लाल झालेला होता....


... ऍन्थोनी वेअरहाउसमध्ये उभा राहून त्याची सगळी हकिकत सांगत होता. आणि त्याच्या भोवताली जमलेले सॅम आणि त्याची टीम सगळी हकिकत लक्ष देवून ऐकत होते. त्याला घातलेल्या बेड्यांना पकडून अजूनही दोन पुलिस त्याच्याजवळ उभे होते. डिटेक्टीव सॅमही त्याची हकीकत लक्ष देवून ऐकत होता.

'' मी तिच्यावर खुप... म्हणजे अगदी जिवापाड प्रेम केलं'' ऍंन्थोनी एक उसासा टाकत म्हणाला.

'' पण मला जेव्हा कळलं की ती माझ्यावर नसून जॉनवर प्रेम करते... मी खुप निराश, हताश झालो, मला तिचा रागही आला.. पण हळू हळू मी माझ्या मनाला समजावले की मी तिच्यावर प्रेम करतो म्हणून तिनेही माझ्यावर प्रेम करावे हे जरुरी नाही... ती कुणावरही प्रेम करण्यास मुक्त असायला हवी.'' ऍन्थोनी म्हणाला.

'' मग तु त्या चार लोकांना का मारलं?'' सॅमने मुळ मुद्द्याची गोष्ट विचारली.

'' कारण दुसरं कुणीही करु शकणार नाही एवढं प्रेम मी तिच्यावर केलं होतं..."" ऍंन्थोनी अभिमानाने म्हणाला.

'' जॉननेही तिच्यावर प्रेम केलं होतं...'' सॅमने त्याला अजुन डिवचण्याचा प्रयत्न केला.

'' तो भित्रा होता... नॅन्सीने त्याच्यावर प्रेम करावे अशी त्याची लायकी नव्हती'' ऍंन्थोनी तिरस्काराने म्हणाला, '' तुम्हाला माहित आहे?... जेव्हा तिच्यावर बलात्कार होवून तिचा खुन झाला तेव्हा त्याने मला एक पत्र लिहिले होते'' ऍंन्थोनी पुढे म्हणाला.

'' काय लिहिलं होतं त्यानं?'' सॅमने विचारले.

'' लिहिलं होतं की त्याला नॅन्सीवर झालेल्या बलात्काराचा आणि तिच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे... आणि त्याने ते चार गुन्हेगार शोधले आहेत ... पण त्याची त्यांचा बदला घेण्याची हिंम्मत होत नाही आहे.. वैगेरे.. वैगेर .. असं त्यानं बरच काही लिहिलं होतं... मी मित्र या नात्याने त्याला चांगला ओळखत होतो.. पण तो एवढ्या भ्याड असेल अशी मला कल्पना नव्हती... मग अशा परिस्थीतीत तुम्हीच सांगा मी काय करावं असं अपेक्षीत होतं... जर तो बदला घेवू शकत नव्हता तर त्या चौघा दानवांचा बदला घेण्याची जबाबदारी माझी झाली होती... कारण तिने जरी माझ्यावर केलं नसलं तरी मी तिच्यावर खरं प्रेम केलं होतं...'' ऍंन्थोनी भावनावेगाने बोलत होता. तो इतका भराभर आणि उत्तेजीत होवून बोलत होता की त्याचा चेहरा लाल लाल झाला होता आणि त्याच्या श्वासांची गती वाढली होती. जेव्हा ऍंथोनी बोलायचं थांबला. त्याचं सर्वांग घामाने भिजून गेलं होतं. त्याला त्याचे हातपाय गळाल्यागत होत होतं. तो मटकन खाली जमिनीवर बसला, त्याने आपला चेहरा आपल्या दोन्ही गुडघ्यात लपविला आणि तो आता ओक्साबोक्शी रडू लागला होता. इतक्या वेळपासून तो रोखण्याचा प्रयत्न करीत होता तो बांध जणू तूटला होता.

त्याच्या भोवती जमा झालेले सगळेजण सहानुभूतीने त्याच्याकडे पाहत होते.


क्रमश:...

Read more...

CH 41 ऍन्थोनीची कहानी

सॅम आणि त्याचे साथीदार अजुनही ऍन्थोनीच्या अवतीभोवती उभे होते. ऍन्थोनीचा प्रतिकार आता पुर्णपणे संपला होता. एव्हाना सॅमच्या दोन साथीदारांनी त्याला हातात बेड्या घालून ताब्यात घेतले होते. सॅमने तिथेच त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला होता. शेवटी एक प्रश्न जाणून घेण्यास सगळे जणच उत्सुक होते. सॅमलाही वाटत होते नंतरची चौकशी जेव्हा व्हायची तेव्हा होऊ देत. कमीत कमी आता त्याला बऱ्याच दिवासापासून सतावणाऱ्या त्या एका प्रश्नाचे उत्तर हवे होते. की का? का ऍन्थोनीने त्या चार झणांना जिवे मारावे?

ऍन्थोनीच्याही आता पुर्णपणे लक्षात आले होते की आपल्याला बोलण्याशिवाय काही पर्याय नाही. तो सगळं काही एखाद्या पोपटासारखं सांगु लागला ....


.... ते जुने जॉन, नॅन्सी आणि ऍन्थोनीचे कॉलेजचे दिवस होते. वर्गात शिक्षक शिकवित होते आणि विद्यार्थांमध्ये जॉन, नॅन्सी आणि ऍंथोनी वर्गात वेगवेगळ्या जागेंवर बसलेले होते. ऍथोनीने समोर पहाता पहाता जेव्हा शिक्षकाचे लक्ष आपल्याकडे नाही असे पाहून चोरुन एक कटाक्ष नॅन्सीकडे टाकला. पण हे काय? ती त्याच्याकडे न पाहता चोरुन जॉनकडे पाहत होती. त्याचा तिळपापड होत होता.

आपण वर्गातले एक हुशार विद्यार्थी...

एकसे एक पोरी आपल्यावर मरायला तयार ...

पण जिच्यावर आपला जिव जडला ती आपल्याला जुमानत नाही ? ...

त्याचा अहंकार दुखावल्या जात होता.

नाही हे होणं शक्य नाही...

कदाचित तिला आपला जिव तिच्यावर जडला आहे हे माहित नसावे...

तिला हे माहीत होणे आवश्यक आहे...

तिला हे माहित झाल्यावर ती आपोआपच आपल्यावर प्रेम करायला लागेल...

विचार करता करता त्याने मनोमनी एक निर्णय घेतला.

दुपारची वेळ होती. कॉलेज नुकतच सुटलं होतं आणि नॅन्सी आपल्या घरी परतत होती. घाई घाईने ऍंथोनी तिचा पाठलाग करीत तिला गाठण्याचा प्रयत्न करीत होता. तो तिच्या जवळ पोहोचताच त्याने मागून तिला आवाज दिला, '' नॅन्सी''

मागून आलेला आवाज ऐकताच ती थांबली आणि वळून मागे पाहू लागली. ऍन्थोनी जॉगींग केल्यागत पटकन तिच्या जवळ जावून पोहोचला.

'' काय... ऍन्थोनी'' तिने आश्चर्याने त्याला विचारले.

कारण तो सहसा कुणाशी बोलत नसे. आणि आज असा मागे मागे धावून आपल्याशी बोलतोय. तो वर्गात टॉप असल्यामुळे तिला त्याच्याबद्दल एक आदर होता. तिलाच काय वर्गातल्या सर्व मुला मुलींना त्याच्या बद्दल आदर होता.

'' नाही ... म्हणजे... तुझ्यासोबत मला एक महत्वाचं बोलायचं होतं'' तो म्हणाला.

नॅन्सीने त्याच्या चेहऱ्याकडे निरखुन बघितले आणि ती त्याला काय बोलायचे असेल हे समजुन घेण्याचा प्रयत्न करु लागली. एव्हाना ते दोघं सोबत सोबत चालायला लागले होते.

'' नाही ... म्हणजे... ऍक्चूअली..'' तो शब्दांची जुळवाजुळव करीत म्हणाला, '' म्हणजे...मला तुला प्रपोज करायचं होतं... विल यू मॅरी मी'' त्याने भराभर महत्वाचे शब्द निवडले आणि त्याला जे बोलायचे होते ते बोलून तो मोकळा झाला.

अचानक तो असं काही बोलेल अशी नॅन्सीला अपेक्षा नव्हती.

तो गंमत तर करीत नसावा ? ...

तिने त्याच्या चेहऱ्याकडे निरखुन बघितले आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव समजून घेण्याचा प्रयत्न केला.

त्याच्या चेहऱ्यावरुन तरी तो गंमत करीत असावा असं वाटत नव्हतं...

'' आय ऍम सिरीयस '' तो तिचा उडलेला गोंधळ पाहून म्हणाला.

पुन्हा तिने त्याचे भाव ताडण्याचा प्रयत्न केला. ती त्याला ते एकाच वर्गात शिकत असल्यामुळे जाणत होती. तिला त्याचा स्वभाव चांगला ठाऊक होता. अश्या प्रकारची गंमत करणे त्याचा स्वभावात नव्हतं. आणि नॅन्सीच्या स्वभावात भिडस्तपणा आणि स्पष्टवक्तेपणा होता. त्यामुळे पटकन ती त्याच्याबद्दल तिच्या ज्या भावना होत्या त्या बोलून मोकळी झाली. शेवटी ती जॉनवर प्रेम करीत होती.

'' ऍन्थोनी... आय ऍम सॉरी बट आय कांन्ट'' ती म्हणाली.

ऍन्थोनीला हे अपेक्षीत नव्हतं. तो आश्चर्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला.

ती इतक्या सहजासहजी आपल्याला कशी धुडकावून लावू शकते?...

त्याचा अहंकार दुखावल्या जात होता.

'' पण का?'' तो आता पुरता चिडला होता.

ती भराभर पुढे चालत होती आणि तोही भराभर चालत तिच्यासोबत चालण्याचा प्रयत्न करीत होता.

'' बघ मी वर्गात टॉपर आहे... पुढे कॉलेज संपल्यावर न्यूरॉलाजीमध्ये रिसर्च करण्याचा माझा प्लॅन आहे... माझ्या समोर एक उज्वल भविष्य आहे... आणि मला खात्री आहे की मला जर तुझ्यासारख्या सुंदर मुलीची साथ मिळाल्यास जिवनात मी अजुनही बरचं काही मिळवू शकतो'' तो तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होता.

'' ऍंथोनी.. तु एक चांगला मुलगा आहेस, हूशार आहेस... यात वादच नाही .. पण मी तुझ्यासोबत लग्नाचा विचार करु शकत नाही'' तीही आता त्याला समजावण्याचा प्रयत्न करु लागली.

'' पण का? '' तो रागाने म्हणाला.

'' तुला माहित आहे?... मी तुझ्यावर प्रेम करतो...'' तो आता गिडगीडायला लागला होता.

'' कारण मी दुसऱ्याच कुणावर तरी प्रेम करते... '' ती म्हणाली.

ती पुढे चालतच होती. ऍंथोनी आता थांबला होता. तो तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे निराशेने पाहत होता.


क्रमश:...

Read more...

CH 40 खुन्याचा शोध ? / Killer found?

ज्या जागेवरून सिग्नल येत होते त्या जागेजवळ सॅम आणि त्याची टीम येवून पोहोचली. ते एक वेअर हाऊस होते. आणि वेअर हाऊसच्या समोर आणि आजुबाजुला मोठी मोकळी जागा होती.

'' कॉम्प्यूटर वर तर हीच जागा दाखवली गेली होती... म्हणजे इथे वेअर हाउसमध्येच तो खुनी दडला असावा'' सॅम आपल्या हातातील नकाशावर आणि त्या वेअर हाऊसच्या आजुबाजुचा परिसर पाहत म्हणाला.

ड्रायव्हरने सॅमकडे त्याच्या पुढच्या आदेशासाठी पाहाले.

'' गाडी वेअरहाऊसच्या कंपाऊंडमध्ये घे '' सॅमने ड्रायव्हरला आदेश दिला.

'' यस सर '' ड्रायव्हर म्हणाला आणि त्याने गाडी वेअर हाऊसच्या मोकळ्या मैदानात घुसविली.

त्यांच्या मागे येत असलेल्या गाड्याही त्यांच्या मागे मागे त्या वेअरहाऊसच्या मोकळ्या मैदानात घुसल्या.

सॅमच्या गाडीच्या मागे सगळ्या गाड्या वेअर हाऊससमोर थांबल्या. गाडी थांबल्याबरोबर सॅमने आपल्या वायरलेसचा ताबा घेतला.

'' ट्रूप2, ट्रूप3 ताबडतोब वेअरहाऊसला चारी बाजुने वेढा द्या'' गाडीतून उतरता उतरता सॅम वायरलेसवर आदेश देवू लागला.

त्याचे साथीदारही ताबडतोब गाड्यांतून उतरु लागले.

'' ट्रूप2 वेअरहाऊसच्या उजवीकडून जा आणि ट्रूप3 डावीकडून'' त्यांचा गोंधळ होवू नये म्हणून सॅमने आपला आदेश अगदी स्पष्ट करुन सांगीतला.

गाडीतून उतरल्याबरोबर ट्रूप2 वेअरहाउसच्या उजवीकडून तर ट्रूप3 डावीकडून जावून त्यांनी वेअर हाऊसला संपूर्णपणे घेरले. खुनी जर वेअरहाऊसमध्ये दडला असेल आणि त्याला पळून जायचे असेल तर त्याला हा कडा भेदून जावे लागणार होते. आणि ते जवळजवळ अशक्य होते.

आपल्या दोन तुकड्यांनी व्यवस्थीत पुर्णपणे वेअरहाऊसला घेरल्याची खात्री झाल्यानंतर सॅम आपल्या सोबतच्या तुकडीसोबत, ट्रूप1 सोबत, वेअरहाऊसच्या दरवाजाजवळ जवळ जवळ धावतच गेला.

'' ट्रूप1 वेअरहाऊसमध्ये घुसणार आहे... सगळेजण तयार रहा... आत कितीजण असावेत याचा आपल्याला अजुनतरी अंदाज नाही आहे'' सॅमने पुन्हा एकदा सगळ्यांना सतर्कतेचा इशारा दिला.

वेअरहाऊसमध्ये एकाजागी सुरु असलेल्या कॉम्प्यूटरचा चमकणारा मॉनिटर सोडल्यास सगळीकडे अंधार होता. त्या कॉम्प्यूटरच्या समोर एक पाठमोरी आकृती उभी होती आणि त्याची आपल्या बॅगमध्ये सामान भरण्याची गडबड चाललेली होती. सगळे खुन तर आटोपले होते. आता त्याची पळून जाण्याची तयारी दिसत होती. अचानक सामान भरता भरता तो थांबला. त्याला वेअरहाऊसच्या बाहेर किंवा आत कशाचा तरी आवाज, कशाची तरी चाहूल लागली असावी. तो तसाच पाठमोरा उभा राहून चाहूल घेवू लागला.

सगळं व्यवस्थीत पार पडलं आणि आता आपल्याला उगीच कसले तरी भास होत आहेत...

आता पर्यंत आपल्याला कुणी पकडू शकलं नाही ते आता काय पकडणार आहेत?...

तशी आपली योजना काही कमी फुलप्रुफ नव्हती...

त्याने आपल्या डोक्यातले विचार झटकले आणि पुन्हा सामान भरण्यात मग्न झाला.

अचानक त्याला मागुन आवाज आला, '' हॅन्डस अप.. यू आर अंडर अरेस्ट''

त्याने चपळाईने आपल्या बॅगमधून काहीतरी कदाचित एखादं हत्यार काढण्याचा प्रयत्न केला.

पण त्याच्यापेक्षा जास्त चपळाईने डिटेक्टीव्ह सॅमने त्याच्या भोवताली बंदूकीच्या गोळ्या झाडून जणू एक कडं तयार केलं.

'' मुर्खपणा करण्याचा प्रयत्न करु नकोस..'' सॅमने त्याला बजावले.

त्याच्या हातातून तो भरत होता ती बॅग गळून पडली आणि त्याने आता आपले दोन्ही हात वर केले. हळू हळू तो सॅमकडे वळू लागला.

तो जसा वळू लागला. सॅम मनातल्या मनात एक एक अंदाज बांधत होता.

तो कोण असावा?...

आणि हे सगळे खुन त्याने का केले असावेत?...

जसा तो पुर्णपणे सॅमकडे वळला, सुरु असलेल्या मॉनिटरच्या प्रकाशात त्याचा चेहरा दिसायला लागला.

डिटेक्टीव्ह सॅमच्या चेहऱ्यावर आश्चर्याच्या छटा उमटायला लागल्या.

तो दुसरा तिसरा कुणी नसून ऍन्थोनी होता, जॉन आणि नॅन्सीचा कॉलेजातला मित्र!

डिटेक्टीव्ह सॅमच्या एका प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. पण त्याचा दुसरा प्रश्न 'हे सगळे खुन त्याने का केले असावेत?' अजुनही अनुत्तरीत होता.

डिटेक्टीव्ह सॅम आणि त्याचे साथीदार आता हळू हळू पुढे सरकु लागले. सॅमने वायरलेसवर खुनी सापडल्याची वार्ता त्याच्या सगळ्या टीमला कळविली. त्यांनी ऍंन्थोनीला चारही बाजुने घेरले.


क्रमश:...

Read more...

CH-39 स्फोट

डिटेक्टीव्ह सॅम आणि त्याच्या टिमच्या गाड्या भरदार वेगाने रस्त्यावरुन धावत होत्या. खुन्याचं ठिकाण तर त्यांना कळलं होतं पण आता लवकरात लवकर जावून तो तिथून पसार होण्याच्या आत त्याला पकडनं आवश्यक होतं. गाड्यांच्या वेगासोबत सॅमच्या डोक्यातले विचारसुध्दा धावायला लागले. तो मनातल्या मनात सगळ्या शक्यतेचा आणि परिस्थीतीचा आढावा घेत त्या पडताळून पाहत होता. आणि प्रत्येक परिस्थीतीत आपली काय स्ट्रॅटेजी असेल हे ठरवित होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईलची बेल वाजली. त्याच्या विचारांची श्रुंखला तुटली.

त्याने मोबाईलच्या डिस्प्लेकडे बघितले आणि पटकन फोन अटेंड केला, '' हं बोल''

'' सर इथे एक सिरियस प्रॉब्लेम झाला आहे '' तिकडून इरिकचा आवाज आला.

सिरीयस प्रॉब्लेम म्हटल्याबरोबर सॅमला अवसान गळाल्यागत झाले. त्याच्या मनात पाल चूकचूकली.

'' काय? ... काय झालं?'' सॅमने उत्तेजित होवून उत्कंठेने विचारले.

'' सर त्या मांजरीचा इथे एखाद्या बॉंबप्रमाणे स्फोट झाला आहे'' इरिकने माहिती पुरवली.

'' काय?... स्फोट झाला?'' सॅमच्या तोंडातून आश्चर्याने निघाले.

त्याला एक एक आश्चर्याचे धक्के बसत होते.

'' पण कसा काय?'' सॅमने पुढे विचारले.

'' सर त्या मांजरीच्या गळ्यातल्या पट्यात प्लास्टीक एक्प्लोजीव बांधलेले असावे .. मला वाटतं की सिग्नल ब्लॉक होताच त्याच्या स्फोट व्हावा अश्याप्रकारे त्याला प्रोग्रॅम केलं असावं की जेणेकरुन खुन्याचे सावज कोणत्याही परिस्थीतीत त्याच्या तावडीतून सुटू नये '' इरिकने आपला अंदाज वर्तविला.

'' क्रिस्तोफर कसा आहे?... त्याला काही झालं तर नाही ना?'' बॉंब स्फोट आणि सावज म्हटल्याबरोबर पुढचा विचार सॅमच्या डोक्यात क्रिस्तोफरचा आला.

इतकं करुनही आपण त्याला वाचवू शकलोकी नाही हे जाणून घेण्याची त्याला घाई झाली होती.

'' नाही सर तो त्या स्फोटात जागच्या जागीच ठार झाला'' तिकडून इरिक म्हणाला.

'' शिट ...'' सॅमच्या तोंडून वैतागाने निघाले, '' आणि आपली लोक?... ती कशी आहेत?'' सॅमने पुढे विचारले.

तो गेला तर गेला ... आपल्या लोकांनातरी काही होता कामा नये...

त्याला मनोमन वाटत होते. तशीही एक सर्वसाधारण माणूस म्हणून त्याला त्याच्याबद्दल काहीही सहानूभूती नव्हती. एक पुलिस ऑफिसर म्हणून, एक कर्तव्य म्हणून त्याचा त्याला वाचविण्याचा इतका आटापिटा होता.

'' दोघंजण जखमी झाले आहेत, आम्ही त्यांना हॉस्पीटलमध्ये नेतो आहोत...'' इरिकने माहिती पुरवली.

'' कुणी सिरीयस जखमी तर नाही ना'' सॅमने पुन्हा खात्री करुन घेण्यासाठी विचारले.

'' नाही सर... जखमा तशा किरकोळच आहेत'' तिकडून आवाज आला.

'' हे बघ, तेथील पुर्ण जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो... आम्ही इकडे जिथून सिग्नल येत होते तिथे जवळपासच आहोत... थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचू... तिकडचं तु आणि रिचर्ड दोघंजण व्यवस्थीत हॅन्डल करा''

'' यस सर...''

'' आपल्या लोकांची काळजी घ्या'' सॅम म्हणाला आणि त्याने फोन कट केला.

'' चला लवकर... आपल्याला घाई केली पाहिजे... तिकडे त्या क्रिस्तोफरला तर आपण वाचवू शकलो नाही... कमीत कमी या खुन्याला तरी पकडू शकलो पाहिजे...'' सॅम ड्रायव्हरला घाई करीत म्हणाला.


क्रमश:.

Read more...

CH-38 सिग्नल ब्लॉकर / Signal blocker

We can't all be stars, but we can twincle - ANONYMOUS

---


क्रिस्तोफरच्या घराच्या शेजारच्या कॅबिनमध्ये इरिक अजुनही कॉम्प्यूटरसमोर बसला होता. तो कॉम्प्यूटरच्या किबोर्डची बटनं दाबून काहीतरी करीत होता.

रिचर्ड त्याच्याकडे पाहत म्हणाला, '' आश्चर्याची गोष्ट आहे!''

'' कोणती ?'' इरिकने विचारले.

'' की ... साहेब गेले तरी तु कॉम्प्यूटरवर सिरीयसली काम करतो आहेस'' रिचर्ड उपरोधाने म्हणाला.

'' अरे नाही ... मी हे सगळं बंद कसं पाडता येईल ते बघतो आहे... की जेणेकरुन इथून माझी सुटका तरी होईल '' इरिक म्हणाला.

रिचर्डने कीबोर्ड त्याच्याकडून हिसकाटून घेतला.

'' अरे ... नाही मी गंमत करीत होतो '' इरिकने स्पष्टीकरण देत म्हणाला.

अचानाक कन्ट्रोल बोर्डवर पुन्हा 'बिप' 'बिप' असा आवाज येवू लागला. दोघांनीही सुरवातीला कंट्रोल बोर्डकडे आणि नंतर टिव्ही स्क्रिनवर बघितले. मांजर बेडरुमजवळ पोहोचल्याची टिव्ही स्क्रिनवर दिसत होती.

'' मला वाटतं मांजर सिग्नल ब्लाकींग एरियाच्या आवाक्यात आलेली आहे'' रिचर्ड जणू स्वत:शीच बोलला.

आता 'बिप' 'बिप' आवाज अजुनच जोराने यायला लागला.

'' बघ ... बघ ... मांजर सिग्नल ब्लाकींग एरियात पोहोचलेलं आहे'' रिचर्डने पटकन वायरलेस उचलला आणि कन्ट्रोल पॅनलवर एका ब्लींक होणाऱ्या लाईटकडे इशारा करीत म्हटले.

रिचर्ड उत्तेजीत होवून आनंदाने आणि उत्साहाने वायरलेसवर बोलणार एवढ्यात इरिकने चपळाईने वायरलेस रिचर्डच्या हातातून हिसकून घेतला. रिचर्ड रागाने इरिककडे पाहत होता.

'' सर ... मांजर आता सिग्नल ब्लॉकींगच्या एरियात येवून पोहोचली आहे'' इरिकने सॅमला इन्फॉर्म केले.

'' अच्छा... तिच्यावर आता व्यवस्थीत लक्ष ठेवा'' तिकडून सॅमचा आवाज आला.

'' यस सर...'' इरिक म्हणाला.

'' मी इकडे खुन्याला पकडण्याचं बघतो आणि लक्षात ठेवा तिकडची पुर्ण जबाबदारी तुमची आहे'' सॅमने त्यांना बजावले.

'' यस सर..'' इरिक म्हणाला.

आणि तिकडून सॅमने फोन कट केला.

'' सिग्नल ब्लॉकरने सर्व सिग्नल ब्लाक केले आहेत आणि आता त्या खुन्याचा एकही आदेश त्या मांजरीपर्यंत पोहोचणार नाही'' रिचर्ड मॉनिटरकडे अणि टिव्ही मॉनिटरकडे बघत पुन्हा उत्तेजीत होत म्हणाला.

टिव्ही मॉनिटरवर आता ते मांजर गोंधळलेली दिसत होती. ती कधी पुढे जात होती तर कधी मागे. तिला कुठे जावं काही समजत नसावं असं वाटत होतं.

अचानक त्यांच्या समोर ठेवलेल्या सर्कीट टिव्हीवर दिसलं की त्या मांजरीचा एखाद्या बॉंबप्रमाणे एक मोठा स्फोट झाला. इतका मोठा की यांचं कॅबिन बरंच दूर असुनही तिथेसुद्धा हादरे बसले.

कॅबिनमधलं कॉम्प्यूटर आणि सर्कीट टिव्ही बंद पडले.

दोघांनाही हा अनपेक्षीत धक्का होता. त्यांना हे कसं काय घडलं काही कळत नव्हतं. ते गोंधळून इकडे तिकडे धावायला लागले.

'' हे असं काय झालं एकदम?'' इरिक घाबरुन म्हणाला.

तो एवढा घाबरला होता की त्याला धाप लागली होती.

'' टेररिस्ट अटॅक तर नाही?'' इरिक कसातरी आपल्या श्वासांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत पुढे म्हणाला.

'' मुर्खासारखा काही बरळू नको.. बघितलं नाही का आता... त्या मांजरीचा स्फोट झाला आहे'' रिचर्ड म्हणाला.

रिचर्ड आता तिथून बाहेर पडण्यासाठी दरवाजाकडे धावला.

'' चल लवकर... तिकडे काय झालं ते आपल्याला बघावं लागेल'' धावता धावता तो इरिकला म्हणाला.

ते दोघे जेव्हा क्रिस्तोफरच्या बेडरुममध्ये पोहोचले. त्यांनी बघितलेकी स्फोटामुळे बेडरुम हे बेडरुम राहालं नव्हतं. तिथे फक्त विटा, सिमेंट, आणी मोडलेलं, तुटलेलं सामान इकडे तिकडे विखुरलेलं होतं. त्या ठिगाऱ्यात त्यांना क्रिस्तोफरच्या शरीराचा थोडा भाग दिसला. रिचर्ड आणि इरिक ताबडतोब तिथे पोहोचले. त्यांनी क्रिस्तोफरच्या बॉडीला सामान हटवून ढीगाऱ्यातून बाहेर काढलं. रिचर्डने त्याची नाडी तपासली. पण नाडी बंद होती. त्याचा जिव कदाचित स्फोट झाला तेव्हाच गेला होता.

आता रिचर्ड आणि इरिक बेडरुमकडून घरातल्या इतर भागांकडे वळले. जिथे जिथे त्यांचे साथीदार तैनात होते ते तिथे त्यांचा शोध घेवू लागले. काही जण जखमी अवस्थेत पडलेले होते तिथे ते त्यांच्या मदतीसाठी धावले.

एवढ्या गडबडीत इरिकने आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि एक नंबर डायल केला.

क्रमश:...

Read more...

CH-37 ऑपरेशन पार्ट 2

रिचर्ड, इरिक आणि डिटेक्टीव्ह सॅम समोर ठेवलेल्या सर्कीट टिव्हीवर बघत होते. त्या टिव्हीवर मांजरीच्या सगळ्या हालचाली दिसत होत्या.

रिचर्ड काही दाखविण्याच्या आधीच इरिकने मधे घुसून कॉम्प्यूटरचा ताबा घेतला. रिचर्डला त्याच्या या वागण्याचा राग आला होता. पण काय करणार. चेहऱ्यावर काहीही भाव न येवू देता तो नुसता त्याच्याकडे पाहत राहाला.

कॉम्प्यूटरच्या मॉनीटरवर आता शहराचा नकाशा दिसू लागला. त्या नकाशात एका जागी एक लाल ठिपका सारखा चमकतांना दिसत होता.

इरिक त्या ठिपक्याकडे निर्देश करीत म्हणाला, '' त्या मांजरीला सगळे सिंग्नल्स आणि निर्देश हे इथून येत आहेत ""

'' जिथून सिग्नल येत आहेत ती जागा इथून किती दूर असेल.'' सॅमने विचारले.

इरिकने कॉम्प्यूटरवर इकडे तिकडे क्लिक करुन उत्तर मिळविण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत रिचर्डजवळ उत्तर तयार होते.

तो म्हणाला, '' सर, ती जागा आपल्या जागेपासून पुर्वेकडे साधारणत: पाच किलोमिटर असेल''

'' हो एखादा मिटर इकडे किंवा एखादा मिटर तिकडे '' मधेच इरिकने चोमड्यासारखे वाक्य जोडले.

रिचर्डने पुन्हा इरिककडे पाहाले. त्याला त्याच्या चोमडेपणाचा आणि पुढे पुढे करण्याचा अजुनच राग येत होता.

डिटेक्टीव्ह सॅम क्रिस्तोफरच्या घराच्या समोर उभा राहून वायरलेसवर आपल्या संपूर्ण टीमला आदेश आणि निर्देश देत होता,

'' मला वाटते सगळ्यांना आपापल्या पोजीशन्स समजलेल्या आहेत. आपल्याजवळ आता फक्त हाच एक मौका आहे. आता कोणत्याही परीस्थितीत खुनी आपल्या तावडीतून सुटता कामा नये... तर ज्यांना ज्यांना ज्या ज्या जागेवर तैनात केले आहे ते त्या जागा सोडू नका. आणि उगीच आतबाहेर करण्याची गरज नाही. म्हणूनच आतली आणि बाहेरची जबाबदारी वेगवेगळी वाटून दिली आहे... आणि बाकीचे उरलेले ताबडतोब इथे घराच्या समोर जिपजवळ येवून जमा व्हा...''

साधारणत: पंधरा विस टीम मेंबर्स जिपजवळ जमले. गाड्यांमधून निघण्याच्या आधी सॅमने त्यांना थोडक्यात ब्रिफ केले.

'' जिथून खुनी ऑपरेट करीत आहे ती जागा आपल्याला मिळाली आहे.. म्हणून मी आपल्या टीमला दोन भागात विभागले आहे... सात जण आधीच आपण इथे क्रिस्तोफरचं रक्षण करण्यास तैनात केले आहेत... आणि उरलेले अठरा.. म्हणजे तुम्ही आणि मी .. आपल्याला पुर्ण ऑपरेशनचा दुसरा भाग म्हणजे खुन्याला पकडण्याचे काम करायचे आहे.''

सॅम आता घाई घाई आपल्या गाडीकडे जायला लागला. गाडीकडे जाता जाता त्याने सगळ्यांना आदेश दिला, '' आता चला लवकरात लवकर आपापल्या गाडीत बसा ... आपण पोहोचेपर्यंत तो खुनी तिथून सटकता कामा नये. ''

सगळेजण भराभर आपापल्या गाडीत बसले. आणि सगळ्या गाड्या धुळ उडवित वेगात निघाल्या - खुनी ज्या जागेवरुन ऑपरेट करीत होता तिकडे. सगळ्या गाड्या जेव्हा निघून गेल्या तेव्हा कुठे उडालेल्या धुळीचा ढग हळू हळू खाली बसला.


क्रमश:...

Read more...

Ch-36 सिग्नलचा उगम

---


क्रिस्तोफरच्या घराला लागून एक गेस्टरुम होती. त्या खोलीत दोन पोलीस रिचर्ड आणि इरिक त्यांच्या समोर ठेवलेल्या सर्किट टिव्हीवर क्रिस्तोफरच्या बेडरुममधील सर्व हालचाली टिपत होते.

'' शेवटी आपल्याला कुत्रे आणि मांजराच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचं काम भेटलंच'' इरिक उपाहासाने म्हणाला.

'' तिन दिवसांपासून हेच काम आपण करीत आहोत ... बास... आता बास झालं... हे असं एका जागी बसून तीच ती बेडरुम बघायची'' इरिक चिडून म्हणाला.

'' आणि एक लक्षात ठेव मी पुलिस फोर्स एखाद्या रेपीस्ट आणि खुन्याचं संरक्षण करण्यासाठी नाही जॉईन केली '' इरिक अजूनही बडबड करीतच होता.

थोडा वेळ इरिक शांत राहाला आणि पुन्हा त्याची बडबड सुरु झाली.

'' साहेबांची ही कुत्र्यामांजराची थेअरी तर बरोबर वाटते... पण एक गोष्ट कळत नाही?'' इरिक म्हणाला.

इरिकने रिचर्डकडे तो '' कोणती?'' असं विचारेल या आशेने पाहाले. पण तो आपल्या कामात मग्न होता. तो काहीच बोलला नाही.

'' कोणती गोष्ट? विचार तर'' इरिकने रिचर्डच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हलवित विचारले.

त्याने त्याच्याकडे नुसता एक दृष्टीक्षेप टाकला आणि पुन्हा तो आपल्या कामात मग्न झाला.

'' की खुनी कोण असावा?... जॉन म्हणावं तर तो तर मेला... जॉर्ज म्हणावं तर तो जेलमध्ये बंद आहे... मग खुनी कोण असावा?'' इरिकची नुसती बडबड सुरु होती.

रिचर्ड काहीही प्रतिक्रिया व्यक्त न करता नुसती त्याची बडबड ऐकत होता. रिचर्ड त्याच्या बोलण्यावर काहीच बोलत नाही आणि काहीही प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही असे पाहून इरिक अजूनच चिडला

'' कारे तु घरी पण असाच गुमसूम असतो का?'' तो रिचर्डला म्हणाला.

रिचर्डने नुसते त्याच्याकडे बघितले.

'' तू जर घरी असाच असतोस ... तर मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तुला पोरं होतातच कशी'' इरिक आता त्याला चिडविण्याच्या आणि डीवचण्याच्या सुरात म्हणाला. इरिकला वाटत होते की तो अशाने तरी बोलेल. आणि त्याचा अंदाज खरा ठरला.

रिचर्डने त्याच्याकडे वळून प्रतिप्रश्न केला, '' पोरं होण्यासाठी काय बोलण्याची गरज असते? ''

'' हो बरोबर आहे तुझं ... तुझे शेजारी काही न बोलता आपलं काम आटोपून घेत असतील... नाही? '' इरिक अजुनच त्याला डीवचण्याच्या उद्देशाने त्याची गंमत करीत म्हणाला.

रिचर्डने वायरलेस फोन उचलून रागाने त्याच्यावर उगारला. इरिक उठला आणि मोठ्याने हसत इकडे तिकडे पळायला लागला.

अचानक कन्ट्रोल बोर्डवर 'बीप' वाजली.

'' ए बघ बरं...काहीतरी होते आहे'' रिचर्ड म्हणाला.

एका मॉनिटरवर काहीतरी हालचाल दिसली. एक काळी मांजर चालतांना दिसली.

'' पुन्हा मांजर '' इरिक म्हणाला.

'' बघ तिच्या गळ्यात पट्टा सुद्धा आहे'' रिचर्ड म्हणाला.

'' म्हणजे .. आपले साहेब म्हणतात त्याप्रमाणे त्या पट्ट्यात रिसीव्हर आहे वाटतं...'' ईरिक म्हणाला.

'' आणि तो रिसीव्हर डिटेक्ट झाला आहे बहूतेक ... त्याचीच तर बीप वाजली आहे...'' रिचर्ड म्हणाला.

इरिकने वायरलेस उचलला आणि तो वायरलेसवर बोलू लागला.

'' सर ... गळ्यात पट्टा असलेली मांजर घरात आली आहे'' इरिकने त्याच्या बॉसला, सॅमला कळविले.

'' गुड .... आता ते सिग्नल्स कुठून येत आहेत ते ट्रेस करण्याचा प्रयत्न करा'' सॅमने तिकडून बजावले.

तेवढ्यात त्यांनी घरात सिग्नल ट्रेसरची जी यंत्रणा बसवली होती तीनेही कॉम्प्यूटरवर सिग्नल ट्रेस झाल्याचे दर्शविले.

'' सर सिग्नलचा उगमही ट्रेस झाला आहे'' ईरिकने कॉम्प्यूटरकडे पाहत ताबडतोब सॅमला कळविले.

'' ग्रेट जॉब... मी निघालोच आहे... एक पाच मिनिटात पोहोचतो'' सॅम तिकडून म्हणाला आणि तिकडून फोन कट झाला.


क्रमश:...

Read more...

Ch-35: सापळा

Imagination is important than knowledge --- ALBERT EINSTEIN

-------
डिटेक्टीव्ह सॅम कॉन्फरंन्स रुममध्ये पोडीयमवर डेस्कच्या मागे उभा होता. त्याच्या समोर क्रिस्तोफर, दुसरे पोलिस अधिकारी आणि त्याचा पार्टनर बसलेला होता.

'' आता मला कल्पना आलेली आहे की खुनी सगळे खुन कसा करीत असावा..'' डिटेक्टीव सॅमने एक पॉज घेतला आणि चहूवार आपली नजर फिरवीत तो बोलू लागला -

'' म्हणून मी एक प्लॅन बनविलेला आहे... ज्यानुसार आपल्याला खुन्याला तर पकडायचे आहेच सोबतच आपल्याला खुन्याचे पुढचे सावज, क्रिस्तोफरचे रक्षण करावयाचे आहे.... आता या प्लॅननुसार मला नाही वाटत की यावेळी खुनी आपल्या तावडीतून सुटून जावू शकेल...'' सॅम आत्मविश्वासाने बोलत होता.

'' मागच्या वेळीही तुम्ही अशीच शाश्वती दिली होती ... आणि तरीही खुनी रोनॉल्डला मारण्यात यशस्वी झाला '' क्रिस्तोफर कडवटपणे म्हणाला.

'' मि. क्रिस्तोफर अंडरसन मला वाटते तुम्ही आधी माझा प्लॅन ऐकून घ्यावा आणि मग त्यावर वाच्य करावे...'' सॅम क्रिस्तोफरला तसेच सडेतोड उत्तर देत म्हणाला.

सॅमने प्रोजेक्टर ऑन केला. समोर स्क्रिनवर एक आकृती अवतरली.

'' आत्तापर्यंत खुनी खुन करण्यासाठी एका मांजरीचा वापर करीत असावा असं वाटतं... म्हणजे मला तशी खात्री आहे'' सॅम म्हणाला.

सॅमने पुन्हा हातातल्या रिमोटचे एक बटन दाबले. स्क्रिनवर एक मांजरीचं चित्र आणि एक माणूस कॉम्प्यूटर काम करीत आहे असं चित्र अवतरलं.

'' आधीच्या खुनात आढळलेल्या काही बाबींवरुन मी या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहे की आता खुन करण्याची ही एकच पध्दत अस्तित्वात असू शकते... त्यानुसार खुनी हा इथे कॉम्प्यूटरवर बसून मांजरीला सगळे आदेश देतो ... आणि ते सगळे आदेश वायरेलेस टेक्नॉलॉजी द्वारा या इथे मांजरीकडे पाठविले जातात.... हा इथे मांजरीच्या गळ्यात जो पट्टा आहे त्यात एक चिप, रिसीव्हर फिट केलेला आहे ... ते सगळे सिग्नल या रिसीव्हर द्वारा रिसीव्ह केले जातात ... नंतर ते सिग्नल्स या मांजरीच्या गळ्यातल्या पट्यातून मांजरीच्या मेंदूला पूरविले जातात ... आणि त्या सगळ्या सिग्नल्स द्वारा मिळालेल्या आदेशाचे पालन करुन ती मांजर आपल्या सावजावर हल्ला करते... आणि आत्तापर्यंत झालेले सगळे खुन याच पद्धतीचा वापर करुन केले असावेत याची मला पक्की खात्री आहे... ''

सॅमने पुन्हा आपल्या हातातल्या रिमोटचे एक बटन दाबले. समोरचा स्क्रिन ब्लॅंक झाला.

'' ही झाली खुन करण्याची पध्दत आणि आता आपल्या प्लॅनबद्दल...'' सॅम एक दिर्घ श्वास घेवून थोडा वेळ थांबला. त्याने त्याच्या हातातला रिमोट बाजूला ठेवून दिला.

'' आपला प्लॅन मी दोन भागात विभागला आहे... '' समोरच्या लोकांच्या प्रतिक्रियेचं निरिक्षण करीत सॅम पुढे बोलायला लागला, '' आपल्या प्लॅनचा पहिला भाग म्हणजे त्या मांजरीला डिटेक्ट करुन तिला सिग्नल कुठून देण्यात येतात हे ट्रेस करणे होय... याप्रकारे आपल्याला खुन्याचा अतापता मिळेल...'' सॅम पुन्हा एक क्षण थांबून पुढे म्हणाला, '' आणि प्लॅनचा दूसरा भाग म्हणजे त्या मांजरीला मिळणारे सगळे सिग्नलस् रोखने की जेणेकरुन आपण क्रिस्तोफरचं संरक्षण करु शकू ''

सॅमने पुन्हा बाजुला ठेवलेला रिमोट उचलून त्याचे एक बटन दाबले. समोर स्क्रिनवर एका घराचा नकाशा अवतरला.

'' हा क्रिस्तोफरच्या घराचा नकाशा... यालाही आपल्याला दोन भागात विभागायचे आहे....'' सॅमने नकाशातली दोन, एक लहान आणि एक मोठं अशी समकेंद्री वर्तूळं काढलेली होती ती रिमोटच्या लेजर बिमने निर्देशीत केली.

'' या आकृतीत दाखविल्याप्रमाणे हे जे पहिलं बाहेरचं वर्तूळ आहे तो आहे पहिला विभाग... आणि जे आतलं लहान वर्तूळ आहे तो आहे दुसरा भाग. '' सॅम आलटून पालटून दोन्ही वर्तूळांवर लेजर बिम टाकीत म्हणाला.

'' जेव्हा ती मांजर या बाहेरच्या भागात पोहोचेल, आपल्याला ती मांजर घरात आल्याचं कळेल कारण तिथे आपण सिग्नल ट्रकर्स आणि सिग्नल रिसीव्हर डीटेक्टर्स फिक्स केलेले आहेत..'' सॅम आपल्या हातातल्या रिमोटचा लेजर बीम बंद करीत म्हणाला.

'' सिग्नल ट्रकर्स त्या येणाऱ्या सिग्नल्सचा उगम शोधतील... आणि एकदा का आपल्याला त्या सिग्नल्सचा उगम माहित झाला की आपण त्या खुन्याला लोकेट करुन रेड हॅन्डेड पकडू शकतो...'' सॅमने लेजर बिम सुरु करुन बाहेरच्या वर्तूळाकडे निर्देश करीत म्हटले,

'' जेव्हा ती मांजर आतल्या वर्तुळात पोहोचेल, तिथे ठेवलेले सिग्नल ब्लाकर्स तिला खुन्याकडून मिळणारे सगळे सिग्नल्स आणि आदेश ब्लॉक करतील. म्हणजे नंतर त्याचे त्या मांजरीवर काहीही नियंत्रण राहणार नाही'' सॅम लेजर बिम आतल्या वर्तूळाकडे निर्देशीत करीत म्हणाला.

सॅमने आपली संपूर्ण योजना सगळ्यांना समजावून सांगितली आणि बोर्डरुममध्ये बसलेल्या सगळ्यांवर एक नजर फिरवली. समोर बसलेले सगळे ऑफिसर्स आणि पोलिस स्टाफ सॅमच्या या योजनेबद्दल समाधानी वाटत होते.

'' कुणाला काही शंका? '' सॅमने समोर बसलेल्यांना विषेशत: क्रिस्तोफरकडे पाहून विचारले.

'' बघूया..'' क्रिस्तोफर खांदे उडवित म्हणाला. तो या योजनेबद्दल तेवढा समाधानी भासत नव्हता.

खरं म्हणजे तो आतून एवढा हादरला होता की कोणतीही योजना समजुन घेण्याच्या मनस्थीतीत तो नव्हता. आणि ते वाजवीही होतं कारण त्याला स्पष्टपणे खुन्याच्या यादीत पुढचा नंबर त्याचा दिसत होता.

'' तर चला आता या योजनेनुसार आपआपल्या कामाला लागा... मी जेफकडे कुणाला काय काय करायचे आहे याची तपशीलवार यादी दिलेली आहे ... कुणाला काही शंका असेल तर मला विचारा''

सॅम आपल्या टीमकडे पाहून म्हणाला.

क्रमश:...

Read more...

Ch-34: कोडं उलगडलं?

डिटेक्टीव्ह सॅम सकाळी सकाळी हॉलमध्ये बसून चहा पित टीव्ही बघत होता. एक एक घोट हळू हळू पित जणू तो चहाचा आनंद घेत होता. बघायला गेलं तर तो टीव्हीकडे बघत होता पण त्याच्या डोक्यात वेगळ्याच विचारांचं काहूर माजलेलं दिसत होतं. कदाचित तो त्या खुनाच्या केसबद्दलच विचार करीत असावा. जसे जसे त्याचे विचार धावत होते तसा तो रिमोटने पटापट टीव्हीवरचे चॅनल्स बदलत होता. शेवटी तो कार्टून चॅनल वर येवून थांबला. थोडावेळ कार्टून चॅनल पाहून त्याने कदाचित स्वत:ला सारखे टेन्शंन्स, सारखा दबाव यापासून दूर नेवून पुन्हा ताजे टवटवित केले असावे. पुन्हा त्याने चॅनल बदलला आणि आता तो डिस्कव्हरी चॅनल बघू लागला. कदाचित डिस्कव्हरी चॅनलवर सुरु असलेल्या प्रोग्रॅममध्ये त्याला इंटरेस्ट वाटत असावा. त्याने हातातले रिमोट बाजुला ठेवून दिले आणि तो प्रोग्रॅम तो लक्ष देवून पाहू लागला.


डिस्कव्हरी चॅनलवर सुरु असलेल्या प्रोग्रॅममध्ये एक उंदीर दाखविला होता. त्या उंदराच्या गळ्यात एक छोटा पट्टा दिसत होता आणि डोक्याला अगदी बारीक बारीक वायर्स लावलेले दिसत होते. त्यानंतर टीव्ही ऍन्कर बोलायला लागला -

'' जेव्हा एखादा जिवजंतू एखादी क्रिया करतो त्याला ती क्रिया करण्यासाठी त्याच्या मेंदूला एक सिग्नल गेलेला असतो. जर आपण अगदी तसाच सिग्नल त्याच्या मेंदूला बाहेरुन देण्यात यशस्वी झालो तर आपण त्या जिवजंतूला आपल्या कह्यात करुन, त्याला बाहेरुन सगळे सिग्नल्स देवून, त्याच्याकडून जे पाहिजे ती क्रिया करुन घेवू शकतो''

मग टिव्हीवर एक कॉम्प्यूटर दिसू लागला. कॉम्पूटरच्या समोर एक शास्त्रज्ञ बसला होता.

डिटेक्टीव्ह सॅम टिव्हीवरचा प्रोग्रॅम अगदी तन्मयतेने पाहू लागला.

तो कॉम्पूटर समोर बसलेला शास्रज्ञ बोलू लागला -

'' या कॉम्प्यूटर द्वारे आपण वेगवेगळे सिग्नल या चिपवर, जी की या उंदराच्या गळ्यातल्या पट्यात बांधलेली आहे, त्यावर ट्रान्समिट करु शकतो. या चिपद्वारे हे सिग्नल उंदराच्या मेंदूपर्यंत पोहोचतील. आणि मग जे जे सिग्नल आपण या कॉम्प्यूटरव्दारे देवू त्याप्रमाणे हा उंदीर वेगवेगळी कार्य करायला लागेल.''

मग टिव्हीवर तो उंदीर अगदी जवळून दाखविण्यात आला. एक बारीक चिप त्याच्या गळ्यात पट्टा बांधून त्यात लावलेली होती.

डिटेक्टीव्ह टिव्हीवरचा प्रोग्रॅम पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रीत उत्सुकतेचे भाव दिसत होते.

टिव्हीवरचा शास्त्रज्ञ पुन्हा पुढे बोलू लागला -

'' अश्या प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे आदेश या सिग्नल ट्रान्समिशनद्वारे त्या उंदराला देवू शकतो. आता सध्या आम्ही काही तुरळकच आदेश देण्यात पुर्णपणे यशस्वी झालो आहोत. ''

मग कॉम्प्यूटरच्या मॉनिटरवर सुरु असलेल्या सॉफ्टवरवर त्या शास्त्रज्ञाने माउसच्या सहाय्याने 'राईट' हे बटन दाबले. आणि काय आश्चर्य तो उंदीर उजवीकडे वळून पळायला लागला.

कॉम्प्यूटरवर त्या शास्त्रज्ञाने 'स्टॉप ' हे बटण दाबले आणि तो उंदीर एकदम पळायचे थांबला.

मग त्याने 'लेफ्ट' हे बटन दाबले आणि तो उंदीर डावीकडे वळला आणि तिकडे पळायला लागला.

पुढे त्याने 'जम्प' हे बटण दाबले आणि त्या उंदीराने पळता पळता उडी मारली.

पुन्हा त्याने 'स्टॉप' बटण दाबले आणि तो उंदीर एका खाण्याच्या पदार्थासमोर पोहोचला होता त्या पदार्थासमोर थांबला.

शास्त्रज्ञाने 'ईट' बटन दाबले आणि तो उंदीर त्याच्या पुढ्यातला तो पदार्थ खावू लागला.

पुन्हा त्याने 'स्टॉप' बटन दाबले आणि त्या उंदराने खाण्याचे थांबविले.

आता शास्त्रज्ञाने 'अटॅक' बटन दाबले आणि तो उंदीर त्याच्या समोर ठेवलेले खान्याचे जिन्नस न खाता तोडून तोडून त्याचे तुकडे करायला लागला.

हे सगळं पाहत असतांना अचानक सॅमच्या डोक्यात एक विचार चमकला.

त्याला एक एक प्रसंग आठवायला लागला...


...दोन पुलिस टीमचे मेंबर रिचर्ड आणि इरीक रोनॉल्डच्या घराची सर्कीट टिव्हीवर निगराणी करीत असतांना एका मांजराने सर्कीट टीव्हीच्या ट्रान्समिटर युनिटवर उडी मारली होती. आणि त्यामुळे रोनॉल्डच्या बेडरुममधल्या हालचाली टिव्हीवर दिसने बंद झाले होते. आणि जोपर्यंत रिचर्ड आणि इरिक बेडरुममध्ये पोहोचत नाहीत तोवर खुन झालेला होता.


डिटेक्टीव्ह आपल्या विचारांच्या तंद्रीत टिव्हीसमोरुन उठला. त्याला पुढचा प्रसंग आठवला ...


... जेव्हा डिटेक्टीव्ह सॅम आणि त्याची टीम इन्व्हेस्टीगेशनसाठी रोनॉल्डच्या बेडरुममध्ये गेले होते आणि तपास करतांना सॅमने बेडखाली वाकून पाहाले होते. तेव्हा त्याला बेडखाली दोन चमकारे डोळे दिसले होते.

जेव्हा ते डोळे हळू हळू त्याच्याकडे येवून नंतर झडप घातल्यासारखे त्याच्या अंगावर झेपावले होते. त्याने स्वत:ला बाजूला सारून स्वत:चा बचाव केला होता. आणि नंतर बघितले तर ते एक काळं, गळ्यात बेल्ट बांधलेंलं मांजर होतं. जे दरवाजातून बाहेर पळालं होतं.


आता सॅमच्या डोक्यात एक एक कोडं अगदी स्पष्टपणे उलगडायला लागलं होतं.

आता आपल्याला वेळ वाया घालवून चालणार नाही ...

आपल्याला घाई केली पाहिजे...

विचार करीत डिटेक्टीव पुढच्या कारवाईसाठी घाईघाईने घराच्या बाहेर सुध्दा पडला होता.


क्रमश...

Read more...

Ch-33: आता तुमची बारी

तुरुंगात सगळीकडे अंधार पसरलेला होता. जॉर्ज त्याला कोंडलेल्या कोठडीत एका कोपऱ्यात विचारात गढून गेलेल्या स्थितीत बसला होता. अचानक तो उठून उभा राहाला आणि स्वत:च्या अंगावरचे कपडे फाडायला लागला. कपडे फाडून त्याने मग कोठडीत इकडे तिकडे पडलेल्या फाटलेल्या कापडाच्या चिंध्या जमा केल्या. त्या चिंध्याचं त्याने पुन्हा एक बाहुलं तयार केलं. बाहुलं तयार झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय , भितीदायक हास्य पसरलं.

'' मि. ख्रिस्तोफर ऍन्डरसन... आता तुमची बारी आहे...बरं का'' तो वेड्यासारखा बरळायला लागला.

तिथे ड्यूटीवर असलेला पोलीस बऱ्याच वेळापासून जॉर्जच्या हालचाली टीपत होता. त्याने जसे जॉर्जचे बरळने ऐकले तो घाईघाईने उठून फोनजवळ गेला - त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सुचना देण्यासाठी.


ख्रिस्तोफर त्याच्या घरी हॉलमध्ये पित बसला होता. सोबतच चिंतातूर अवस्थेत तो सिगारेटवर सिगारेट, एक संपलीकी दुसरी लागलीच पेटवून पित होता. थोड्या वेळाने तो उठून उभा राहाला आणि विचार करीत खोलीत हळू हळू येरझारा घालू लागला. त्याच्या हालचालींवरुन तो बराच थकलेला जाणवत होता. किंवा दारुच्या चढलेल्या नशेमुळे तसे जाणवत असावे. थोडावेळ येरझारा घालून मग पुन्हा तो खुर्चीवर बसला आणि आपल्या विचारांच्या तंद्रीत बुडून गेला. अचानक त्याला घरात किचनमध्ये कुणाची तरी उपस्थीती जाणवली. कुणीतरी किचनमध्ये भांडे हाताळीत असावा असा आवाज येत होता.

किचनमध्ये यावेळी कोण असावं?...

सगळी दारं खिडक्या तर बंद आहेत...

का हाही एक भास?...

अचानक एक मोठं भांड जमिनीवर पडल्याचा आवाज झाला. क्रिस्तोफर एकदम उठून उभाच राहाला.

काय झालं असावं.?

त्याला धडकी भरली होती.

उगाच घाबरतो आहे आपण ... मांजर वैगेरे असेल...

त्याने स्वत:ची समजूत घातली आणि हळू हळू चालत चाहूल घेत किचनकडे जावू लागला.

किचनमध्ये आता आवाज थांबला होता. काही चाहूलही येत नव्हती. तो किचनच्या दरवाजाजवळ गेला. हळूच किचनचा दरवाजा तिरका करुन त्याने आत डोकावून बघितले.

किचनमध्ये तर कुणीच दिसत नाही ....

तो किचनमधे शिरला. आत गेल्यानंतर इकडे तिकडे नजर फिरवून बघितले. चांगली किचनमध्ये एक संपूर्ण फेरी मारली.

कुठे काहीच तर नाही ...

का उगीच मला भास होताहेत...

पण जमिनीवर खाली एक भांडे पडलेले होते.

तो किचनमधून परतण्यासाठी वळला तसा त्याला हॉलमध्ये काहीतरी फुटण्याचा आवाज आला. ख्रिस्तोफर जवळ जवळ दचकलाच आणि धावतच हॉलमध्ये आला.

हॉलमध्ये त्याला त्याचा व्हिस्कीचा ग्लास खाली जमिनीवर पडून फुटलेला दिसला. व्हिस्की खाली सांडून सगळीकडे पसरलेली होती. त्याने आजुबाजुला बघितले. कुणीच नव्हते.

ख्रिस्तोफरची दारु पुर्णपणे उतरली होती.

सालं कुणीच तर नाही...

हे काय होत आहे मला? ...

ग्लास कसा काय पडला?...

तो विचार करीत पुन्हा खुर्चीवर बसला. आता त्याने पुर्ण बॉटलच तोंडाला लावली होती.


क्रमश:...

Read more...

Ch-32: एक नवे वळण

सॅम आणि त्याचा पार्टनर ज्या पोलीस अधिकाऱ्याने जॉन कार्टरच्या मरणाची केस हाताळली होती त्या पोलीस अधिकाऱ्यासमोर, डिटेक्टीव टेम्पलटन समोर बसले होते.

डिटेक्टीव टेम्पलटनने जॉन कार्टरबद्दल माहिती पुरविली, '' मद्याच्या अतिसेवनामुळे त्याला ब्रॉंकायटीस होवून तो मेला..''

'' पण तुम्हाला त्याची ओळख कशी पटली? '' सॅमने विचारले.

'' ज्या खोलीत त्याचा मृतदेह सापडला त्या खोलीत काही त्याचे कागदपत्र सुध्दा आढळले ... त्यावरुन आम्हाला त्याची ओळख पटली... आणि त्याचा एक फोटो मि. बेकरने जसा सगळ्या पोलिस ठाण्यांवर पाठविला होता तसा आमच्याकडेही पाठवला होता...''

मि. टेम्पलटनने आपल्या ड्रावरमधून जॉनचा फोटो काढून सॅमसमोर ठेवला.

'' या फोटोमुळे आणि डिटेक्टीव बेकरने पाठविलेल्या माहितीमुळे आम्हाला त्याचा पत्ता आणि घर वैगेरे सापडण्यास मदत झाली'' टेम्पलटन म्हणाला.

'' तुम्ही त्याच्या घरच्यांशी संपर्क केला होता का?'' सॅमने विचारले.

'' हो... त्याच्या घरच्यांनाही इथे बोलावले होते... त्यांनीही बॉडी ताब्यात घेण्याच्या आधी जॉनची ओळख पक्की केली होती आणि पोस्टमार्टमध्येही त्याची ओळख जॉन कार्टर अशीच निश्चीत केली आहे '' टेम्पलटन म्हणाला.

'' तो कधी मेला असावा... म्हणजे शव सापडला तेव्हापासून किती दिवस आधी'' सॅमने विचारले.

'' पोस्टमार्टमनुसार मार्च महिण्याच्या सुरवातीच्या दोन तिन दिवसात त्याचा मृत्यू झाला असावा'' तो अधिकारी म्हणाला.

'' अर्ली मार्च... म्हणजे पहिला खून होण्याच्या कितीतरी आधी...'' सॅम विचार करीत म्हणाला.

'' याचा अर्थ आम्ही समजत होतो त्याप्रमाणे तो खुनी नाही आहे ...'' सॅम पुढे म्हणाला.

'' हो असं वाटतं तर'' टेम्पलटन म्हणाला.

बराच वेळ शांततेत निघून गेला.

म्हणजे मला जी शंका होती ती खरी ठरते तर...

सॅमला नॅन्सीचा मित्र जॉन कार्टरचा पत्ता लागल्याची बातमी त्याच्या पार्टनरकडून फोनवर कळताच तो एकदम हूरळून गेला होता....

त्याला वाटले होते चला एकदाची केस सुटली आणि खुनी आता थोड्याच वेळात त्यांच्या तावडीत येणार आहे.

पण इथे येवून पाहतो तर केसला अजुन एक वेगळंच वळण लागलं होतं....

जॉन कार्टरच्या मरणाची वेळ पाहता त्याचा खुनाशी संबंध असण्याची सुतराम शक्यता नव्हती...

'' जॉन कार्टर जर खुनी नाही ... तर मग खुनी कोण असावा?'' सॅमने जसा स्वत:लाच प्रश्न विचारला.

खोलीतले तिघेही जण नुसते एकमेकांकडे बघायला लागले. कारण त्या प्रश्नाचं उत्तर त्या तिघांजवळही नव्हतं.

तेवढ्यात टेम्पलटनने त्याच्या ड्रावरच्या खनातून अजून एक फोटो काढून सॅमसमोर ठेवला.

सॅमने तो फोटो उचलला आणि तो त्या फोटोकडे निरखून पाहू लागला. त्या फोटोत जॉन कार्टर जमिनीवर पडलेला दिसत होता आणि त्याच्या शेजारीच फरशीवर मोठ्या लाल अक्षरात लिहिलेले दिसत होते,

'' नॅन्सी मला माफ कर मी तुला वाचवू शकलो नाही... पण काळजी करु नको मी त्या एकएकांचा बदला घेईन...''

'' मी ऐकून ऐकून थकलो की या खुनात कुणी माणसाचा हात नसून काहीतरी अमानवी शक्तीचा हात आहे... हा फोटो दाखवून तुलाही तर असेच सुचवायचे नाही ना?'' सॅमने टेम्पलटनला विचारले.

डिटेक्टीव टेम्पलटनने आलटून पालटून सॅमच्या आणि सॅमच्या पार्टनरच्या चेहऱ्यांकडे पाहाले.

'' नाही मला काहीएक सुचवायचे नाही फक्त घडणाऱ्या घटना आणि जॉनने फरशीवर लिहिलेला मेसेज कसे अगदी तंतोतंत जुळतात हे मला तुमच्या निदर्शनात आणून द्यायचे आहे'' डिटेक्टीव टेम्पलटन शब्दांची व्यवस्थित आणि काळजीपूर्वक निवड करीत म्हणाला.


क्रमश:...

Read more...

Ch-31: जॉन कार्टर

डिटेक्टीव्ह सॅमने आपल्या वाजणाऱ्या मोबाईलचा डिस्प्ले बघितला. फोन त्याच्याच पार्टनरचा होता. एक बटन दाबून त्याने तो अटेंड केला,

'' यस''

'' सर आम्हाला नॅन्सीचा मित्र जॉन कार्टरचा पत्ता लागला आहे'' तिकडून त्याच्या पार्टनरचा आवाज आला.

'' गुड व्हेरी गुड'' सॅम उत्साहाने म्हणाला.

सॅमच्या पार्टनरने त्याला एक पत्ता दिला आणि ताबडतोब तिकडे निघून येण्यास सांगितले.


.... जॉन कार्टर बेडवर पडलेला होता आणि जोर जोरात खोकत होता. त्याची दाढी वाढलेली आणि डोक्याच्या वाढलेल्या जटा विस्कटलेल्या होत्या. कितीतरी दिवसांपासून तो असाच बेडला खिळून पडला असावा. त्याचं घरातून बाहेर जाणं येणंही बंद झालं होतं.

जेव्हा त्याच्या प्रिय नॅन्सीचा बलात्कार आणि खुन झाला होता तेव्हा तो इतका हतबल झाला होता की त्याला पुढे काय करावं काही कळत नव्हतं. त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी अशी त्याची मनोमन इच्छा होती पण कशी ते काही कळत नव्हतं. अशा दु:खी आणि हतबल अवस्थेत तो शहारात रात्री अंधाऱ्या रस्त्यावर नुसता वेड्यासारखा फिरत असायचा. तर कधी संध्याकाळी बिचवर जावून मावळत्या सुर्याकडे नुसता बघत राहायचा. त्याला त्याची स्वत:ची अवस्थाही काहीशी त्या मावळत्या सुर्यासारखीच भासत असावी. दिवस रात्र वेड्यासारखं इकडे तिकडे फिरायचं आणि थकल्यानंतर बारमध्ये दारु पित बसायचं अशी त्याची दिनचर्या असायची. पण ते असं किती दिवस चालणार होतं. पुढे पुढे त्यांचं फिरणं कमी होवून पिणं वाढलं. एवढ वाढलं की आता त्याची तब्येत खराब होवून तो बेडला खिळून खितपत पडला होता. बेडवर खिळून पडलेल्या परिस्थीतीतही त्याचं दारुं घेणं सुरुच होतं. थोडीही दारुची नशा उतरली की त्याला ते भयानक बलात्काराचं आणि खुनाचं दृष्य आठवायचं आणि मग तो पुन्हा प्यायला लागायचा.

अचानक त्याला पुन्हा खोकल्याची उबळ आली. तो उठण्याचा प्रयत्न करु लागला. पण तो एवढा क्षीण आणि अशक्त झाला होता की त्याला उठताही येत नव्हतं. कसातरी आधार घेत तो बेडवरुन उठून उभा राहाला पण त्याचा तोल जावून तो जमिनीवर पडला. त्याचं खोकनं सारखं सुरुच होतं. खोकलता खोकलता अचानक त्याला एक मोठी उबळ आली आणि त्याच्या तोंडातून रक्त यायला लागलं. त्याने तोंडाला लागलेलं रक्त हाताला लावून बघितलं. रक्त दिसताच तो घाबरला.

उठून डॉक्टराकडे जायला हवं...

पण त्याला उठताही येईना.

ओरडून लोकांना जमा करायला हवं...

पण त्याच्यात तेवढी ओरडण्याचीसुध्दा शक्ती शिल्लक राहाली नव्हती.

काय करावं?...

शेवटी त्याने एक निर्णय मनाशी पक्का केला आणि तो त्याच्या हाताला लागलेल्या रक्ताने फरशीवर काहीतरी लिहायला लागला....


एक माणूस फोनवर बोलत होता, '' हॅलो पुलिस स्टेशन?''

तिकडून प्रतिक्रिया येण्यासाठी तो मधे थांबला.

'' साहेब ... आमच्या शेजारी कुणीतरी एक अज्ञात ईसम राहातो ... म्हणजे राहत होता .. त्याला आम्ही जवळपास सात-आठ दिवसांपासून बघितलं नाही... त्याचा दरवाजाही आतून बंद आहे... आम्ही त्याचा दरवाजा ठोठावूनसुध्दा बघितला पण आतून काहीच प्रतिक्रिया येत नाही... त्याच्या घरातून सारखा सडल्यासारखा खराब वास येतोय... मला वाटते तूमच्यापैकी कुणीतरी येवून बघितलं तर बरं होईल...''

पुन्हा तो तिकडच्या प्रतिसादासाठी थांबला आणि '' थॅंक यू ... '' म्हणून त्याने फोन खाली ठेवून दिला.

पोलिसांची एक तुकडी डिटेक्टीव्ह टेम्पलटनच्या नेतृत्वात त्या माणसाने फोनवर दिलेल्या माहितीप्रमाणे तिथ पोहोचली. तो माणूस त्यांची वाटच पाहत होता. ते तिथे पोहोचताच त्या माणसाने त्यांना एका प्लॅटच्या बंद दारासमोर नेले. तिथे पोहोचताच एका सडलेल्या वासाचा दर्प त्यांच्या नाकात शिरला. त्यांनी पटापट रुमाल काढून आपापल्या नाकाला लावला. त्यांनी त्या वासाचा उगम शोधण्याचा प्रयत्न केला तर तो सडल्यासारखा घाण वास त्या घरातूनच येत होता. त्यांनी दार ढकलून बघितलं. दार उघडत नव्हतं. कदाचीत दाराला आतून कडी घातलेली असावी. त्यांनी दार वाजविलं. आतून काहीच प्रतिक्रिया नव्हती. ज्याने फोनवर पुलिसांना वर्दी दिली होती तो माणूस पुन्हा पुन्हा तीच हकीकत पुलिसांना सांगत होता. शेवटी पुलिसांनी दार तोडलं. दार तोडल्यानंतर तर तो सडलेला वास अजूनच जास्त येवू लागला. तोंडावर आणि नाकावर घट्ट रुमाल पकडून ते हळू हळू आत जावू लागले.

पोलिसांची तुकडी जेव्हा बेडरुममध्ये पोहोचली तेव्हा त्यांना सडण्याची क्रिया सुरु झालेला जॉन कार्टरचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला. नाक घट्ट पकडून ते त्या मृतदेहाजवळ गेले. तिथे जमिनीवर मरण्याच्या अगोदर त्याने रक्ताने काहीतरी लिहिले दिसत होते. त्यातल्या एका पुलिसाने ते जवळ जावून वाचले,

'' नॅन्सी मला माफ कर मी तुला वाचवू शकलो नाही... पण काळजी करु नको त्या एकएकांचा बदला घेतल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही ...''


क्रमश:...

Read more...

About This Blog

  © Blogger templates Psi by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP